बेळगाव लाईव्ह विशेष:बेळगावातील मराठी जनतेवर ज्या ज्या वेळी संकट येते, बेळगावातील मराठी भाषिक गावाचा मुद्दा ऐरणीवर असतो त्या त्यावेळी सीमेवर आंदोलन करणारे नेतृत्व म्हणून विजय देवणे यांच्याकडे पाहिले जाते.
बेळगावातील मराठी माणूस ज्यावेळी महाराष्ट्राकडे असेना पाहत असतो त्यावेळी भीतीने मूग गिळून गप्प बसलेले महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते बिळात लपून बसलेले असतात. मात्र त्याचवेळी एल्गार करत कार्यकर्त्यांसह बेळगावच्या सीमेला धडक देणारा जबरदस्त नेता म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विजय देवणे हे नेहमीच आघाडीवर असतात.
विजय देवणे यांचा आवाज सीमेवर घुमतो आणि महाराष्ट्र खडबडून जागा होतो. कोल्हापूरच्या जनतेला चेतवण्याचे काम देवणे सातत्याने करत आलेले आहेत . खरं तर बेळगावचे संपर्क मंत्री म्हणून विजय देवणे यांचे कार्य चालू असल्या सारखे वाटते.
खरे समन्वयक मंत्री असलेले चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराज देसाई हे सीमेच्या पलीकडून टप्प्याच्या लांब राहून नुसतेच वांझ गुरगुरण्याचं काम करतात, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षाचा अजेंडा घेऊन निवडणुकीच्या काळात समितीच्या उमेदवाराच्या विरुद्ध प्रचाराला येतात. कोल्हापूरच्या बंटी पाटील यांना तर बेळगाव ग्रामीण आमदारांचे कार्य आपल्या घरच्या कार्यासारखे वाटते. या सगळ्या पार्श्वभूमीवर भगव वादळ होऊन येणारे विजय देवणे म्हणजे बेळगावचा महाराष्ट्रातील आवाज ठरत आहेत.
बुधवारीही कोगनोळी चेक पोस्ट जवळील सीमेवर विजय देवणे यांनी शेकडो शिवसैनिकांसह आंदोलन केले बेळगावात होणाऱ्या काळ्या दिनासाठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आत शिरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कर्नाटक पोलीस आणि देवणे यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. देवणे आणि शिवसैनिकांचे आंदोलन म्हणजे एक प्रकारचा कर्नाटक शासनावर दबाव होता अशी भावना बेळगावकर जनतेची झाली आहे.
आजवर विजय देवणे यांनी सीमेवर केलेली आंदोलने केवळ बेळगावकराना दिलासा म्हणून नव्हे तर सीमेवरील मराठी लोकांवर होणारी दडपशाही रोखण्यासाठी मदतीची ठरत आहेत. देवणे यांचे अनुकरण बंटी पाटील, धनंजय महाडिक समर्जित घाटगे आणि मुंबईतील सर्व पक्षियानी केल्यास बेळगावातील मराठी जनतेला दिलासादायक ठरेल यात तीळ मात्र शंका नाही