बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील जनतेची गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी असलेली वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे बेंगलोर येथून धारवाड मार्गे बेळगावपर्यंत विस्तारित करण्याचा आदेश रेल्वे मंत्रालयाने जारी केला असल्याची माहिती राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी दिली.
काल मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे क्र. 20661 बेंगलोर रेल्वे स्थानकावरून सकाळी 5:45 वाजता प्रस्थान करून दुपारी 1:30 वाजता बेळगावला पोहोचेल.
बेळगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस क्र. 20662 दुपारी 2 वाजता प्रस्थान करून रात्री 10:10 वाजता बेंगलोर रेल्वे स्थानकावर पोहोचेल. ही रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
माझ्या निवेदनाद्वारे केलेल्या विनंतीला मान देऊन बेळगावपर्यंत वंदे भारत एक्सप्रेसची सोय त्वरेने केल्याबद्दल मी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना आणि रेल्वे खात्याला तुमच्या माध्यमातून धन्यवाद देत आहे असे राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या आदेशात वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा धारवाड मार्गे बेंगलोरपासून बेळगावपर्यंत करण्यात आलेला विस्तार वेळापत्रकासह नमूद आहे.
या व्यतिरिक्त वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे जामनगर ते उधना, अजमेर ते चंदिगड आणि गोरखपुर ते प्रयागराज दरम्यानच्या सेवेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.