बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील सदाशिवनगर येथील एक बंद घर फोडून 60,000/- रुपये रोकड आणि 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगावच्या सदाशिवनगर येथील रहिवासी शेखरगौडा मल्लनगौडा पाटील हे 05 नोव्हेंबर रोजी एका लग्नाच्या साखरपुड्यासाठी गोकाक येथे गेले होते. त्यांचे बंद घर पाहून चोरटयांनी डाव साधला. हातोडा, कटावणी, कोयता असे साहित्य वापरून चोरटयांनी घराचे कुलूप व नंतर आतील तिजोरी फोडून कार्यभाग साधला. तिजोरीतील 60,000/- रुपये रोकड आणि 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लुटून चोरटे पसार झाले.
घरमालक पाटील गोकाकहून परत आल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी श्वानपथक घटनास्थळी आणून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
शिवाय ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळावरील ठसे घेतले आहेत. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
बेळगाव शहर परिसर आणि उपनगरात भुरट्या चोऱ्या घरफोड्या अश्या घटना मधून वाढ झाली असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी वाढू लागली आहे.