बेळगाव लाईव्ह :कृतज्ञता हे फार मोठे मूल्य आहे, याचे प्रत्यंतर नुकतेच आले जेंव्हा आपल्या पत्नीच्या आजारपणात समाजाने केलेली मदत लक्षात ठेवून पतीने आता दुसऱ्या कुटुंबातील एका मुलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत केली आहे. मदत करणारे हे कुटुंब आहे भरमा कोलेकर यांचे.
गेल्या जानेवारी 2023 मध्ये एक वेळ अशी होती की आपली शिक्षक पत्नी 37 वर्षीय गीता भरमा कोलेकर हिच्यावरील हृदय शस्त्रक्रियेसाठी (ओपन हार्ट सर्जरी) भरमा यांना आर्थिक मदतीची गरज होती.
मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या हिंदीमध्ये मास्टर्स पदवी घेतलेल्या भरमा कोलेकर यांनी पैशाची उभारणी करण्यासाठी त्यावेळी आपल्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र तरीही पैसे कमी पडत होते. तेंव्हा त्यांना फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे (एफएफसी) प्रमुख संतोष दरेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी मदतीचा हात दिला.
एफएफसीने समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांच्या मदतीने पैशाची उभारणी केली. त्यानंतर गीता कोलेकर यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी होऊन त्यांना जीवनदान मिळाले.
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी समाजाने केलेल्या मदतीची जाणीव ठेवून एफएफसी आणि ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या सहकार्याने भरमा कोलेकर यांनी आज आपली मुलगी कृष्णा हिच्या हस्ते हृदय शस्त्रक्रियेची (ओपन हार्ट सर्जरी) गरज असलेल्या तृतीय पंथी असिफा नाईक यांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.
भरमा कोलेकर हे सध्या एका खाजगी महाविद्यालयात हंगामी व्याख्याता म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांची पत्नी गीता या शिक्षिका तर आहेतच त्याचप्रमाणे मुलगी कृष्णा भरमा कोलेकर ही जोशी सेंट्रल पब्लिक स्कूलची लोअर केजीची विद्यार्थिनी आहे. या कुटुंबाने गरजू रुग्ण असिफा नाईक तिच्या शस्त्रक्रियेसाठी केलेल्या आर्थिक मदतीबद्दल नाईक कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त करून कोलेकर कुटुंबाला दुवा दिला आहे.