बेळगाव लाईव्ह:कर्नाटक राज्य विधिमंडळाच्या बेळगावातील अधिवेशनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही मात्र कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू टी खादर आणि विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी मंगळवारी सकाळी बेळगाव येथील सुवर्ण विधान सौध (SVS) ची पाहणी केली. सदर अधिवेशन आगामी 4 डिसेंबर पासून सुरू होईल अशी शक्यता आहे.
सुवर्ण सौध मधील तयारीची पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना खादर म्हणाले की, सरकारशी चर्चा केल्यानंतरच तारीख जाहीर केली जाईल. “बेळगाव येथे होणाऱ्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या दृष्टीने आम्ही सुवर्ण सौधच्या तयारीची पाहणी केली आहे. येथील सर्व व्यवस्था समाधानकारक असून आम्ही अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतरच अधिवेशनाची तारीख निश्चित केली जाईल, असे ते म्हणाले.
बेळगावातील हिवाळी अधिवेशन यशस्वी व्हावे आणि उत्तर कर्नाटक भागाला त्याचा फायदा होईल यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत, असेही ते म्हणाले. शाळकरी मुलांच्या गैरसोयीची आता दखल घेतली जाणार आहे. शिवाय स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांना फलदायी अधिवेशनासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे खादर यांनी स्पष्ट केले. “तारीख जाहीर झाल्यानंतर तयारीची पाहणी करण्यासाठी आम्ही पुन्हा बेळगावला भेट देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी अधिवेशन काळात आंदोलन अधिक तीव्र करू नये कारण त्यामुळे सर्वांची मोठी गैरसोय होत आहे. “आंदोलकांना संबंधित मंत्र्याला भेटून त्यांच्या मागण्या मांडण्याचे आवाहन केले जाईल आणि सरकार त्यावर तोडगा काढू शकेल,” होरट्टी म्हणाले. मी संप करणार्यांना आवाहन करतो की त्यांनी ते टाळावे ज्यामुळे अधिवेशनाचे कामकाज सुरळीत आणि प्रभावी होण्यास मदत होईल. संप करणाऱ्यांनी संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न मांडावेत, असे ते म्हणाले.
आमदार आसिफ (राजू) सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, झेडपीचे सीईओ हर्षल भोयर, पोलीस आयुक्त सिद्रामप्पा आणि कर्नाटक विधान परिषद आणि विधानसभेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.