Friday, November 15, 2024

/

वेळेवर मदतीला धावून ‘यांनी’ वाचवला वृद्ध रुग्णाचा जीव

 belgaum

बेळगाव लाईव्ह:अर्धांगवायूचा झटका आलेल्या एका वयोवृद्ध रुग्णाला फेसबुक फ्रेंड्स सर्कल (एफएफसी) या सेवाभावी संघटनेने तात्काळ अवघ्या 50 मिनिटात वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याद्वारे त्याचे प्राण वाचवल्याची घटना काल बुधवारी रात्री घडली.

त्याबाबतची माहिती अशी की, फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे (एफएफसी) हितचिंतक असलेल्या सागर मुतकेकर यांना काल सायंकाळी एक फोन आला आणि फोन करणाऱ्याने जांबोटी रोडवरील बामणवाडी क्रॉस येथे राहणाऱ्या एका गरीब कुटुंबाला त्वरेने वैद्यकीय मदतीची गरज आहे.

त्या कुटुंबातील राजाराम अण्णाजी मोहिते यांना अर्धांग वायूचा झटका आल्याचे सांगितले. सदर माहिती मिळताच एफएफसीच्या कार्यकर्त्यांनी संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल वरून बामणवाडी क्रॉस गाठला. त्या ठिकाणी वीज पुरवठा नसलेल्या आड बाजूला एका छोट्या खोलीत दोघे वयोवृद्ध नवरा-बायको रहात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

वीज नसल्यामुळे रात्री तेलाचे दिवे वापरणाऱ्या त्या वृद्ध जोडप्याची विचारपूस केली असता त्यांची नावे राजाराम अण्णाजी मोहिते (वय 73) आणि त्यांची पत्नी सुमन राजाराम मोहिते (वय 68 अशी) असल्याचे समजले. या दोघांचा एकुलता एक मुलगा श्रीधर हा 8 वर्षांपूर्वीच निधन पावला आहे.Old age person

आरोग्याशी संबंधित तक्रारी असणाऱ्या राजाराम यांचे हृदय देखील कमकुवत असल्यामुळे त्यांना नियमित औषधे घ्यावी लागतात. या अवस्थेत आलेला अर्धांगवायूचा झटका त्यांच्या जीवावर बेतू शकला असता. मात्र एफएफसीचे कार्यकर्ते देवासारखे त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेची व्यवस्था करून राजाराम यांना त्वरेने अवघ्या 50 मिनिटात बीम्स हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले. सध्या मेडिसिन वाॅर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

उपरोक्त मदत कार्य यशस्वी करण्यासाठी एफएफसीचे प्रमुख संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे व रुग्णवाहिका चालकाने विशेष परिश्रम घेतले. वयोवृद्ध रुग्ण राजाराम मोहिते आणि त्यांची पत्नी या दांपत्याची घरची परिस्थिती हालाखीची असून त्यांना मदतीची अतिशय गरज आहे. तरी बामणवाडीवासियांसह दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राजाराम मोहिते यांना काल उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर एफएफसीच्या कार्यकर्त्यांनी सुमन मोहिते यांना वरखर्चासाठी आपल्यापरीने पैशाची मदत देखील केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.