Saturday, November 23, 2024

/

भाजपकडून शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न -पालकमंत्री जारकीहोळी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :नगरसेवक हाणामारी प्रकरणाला काँग्रेस -भाजप असे करून राजकीय रंग दिला जात आहे. दोघांमधील वैयक्तिक भांडणाचे भांडवल करून संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे, असा स्पष्ट आरोप राज्याचे बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केला.

शहरातील काँग्रेस भवनमध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मंत्री जारकीहोळी पुढे म्हणाले की, खाऊ कट्ट्यामधील दुकाने नगरसेवकांच्या पत्नींच्या नावे आहेत. त्या संदर्भात तक्रार करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. महापालिका या संदर्भात नगर विकास खात्याकडे आपला अहवाल देणार असून त्यानंतर पुढील गोष्टी ठरणार आहेत. नगरसेवक अभिजीत जवळकर आणि रमेश पाटील या दोघांमधील हाणामारीचा बेळगाव महापालिकेशी अथवा महापालिका बरखास्त करण्याशी काही संबंध नाही. ती त्या दोघांमध्ये टॉवर संदर्भात झालेली व्यक्तिगत हाणामारी आहे. त्यासाठी बेळगाव शहराला वेठीस धरण्याचे कारण नाही. बेळगाव पोलिसांनी डिस्चार्ज प्रमाणपत्र घेऊनच नगरसेवक जवळकर यांना अटक केली आहे. ती दोघांची वैयक्तिक मारामारी असली तरी त्याला काँग्रेस -भाजप असा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नगरसेवक मारहाण प्रकरणात नेमकी कोणाची चूक आहे हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. त्याचप्रमाणे या संदर्भात न्यायालय निर्णय देईल. मात्र या प्रकरणाला भाजप -काँग्रेस असा रंग देणे चुकीचे आहे.

ती निव्वळ दोघांमधील वैयक्तिक मारामारी आहे. या घटनेशी बेळगाव महापालिका बरखास्त तिचा काय संबंध? असे ते म्हणाले. आपल्यावर आलेले बालंट दुसऱ्यावर ढकलण्याचे काम भाजप नेहमीच करत असते. मात्र नगरसेवक मारहाण प्रकरणात न्यायालय निर्णय देणार आहे. पोलिसांकडे हॉस्पिटलचे डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे. मात्र आता तेलंगणाहून येऊन आमदाराने आणखी एक सर्टिफिकेट दिले आहे. मात्र देण्यात आलेले पहिले सर्टिफिकेटच खरे असून ते ग्राह्य मानण्यात आले आहे. त्याला आम्ही काय करणार? ‘त्या’ आमदाराचे प्रताप भरपूर आहेत, केवळ फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून ॲट्रॉसिटी केस घालण्यात आली आहे. त्यांनी अनेकांना वेगवेगळ्या कारणास्तव त्रास दिला आहे, असे जारकीहोळी यांनी सांगितले.

त्या दोघांच्या मारामारीला काँग्रेस -भाजप असे करून राजकीय रंग दिला जात आहे. दोघांमधील वैयक्तिक भांडणाचे भांडवल करून संपूर्ण शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे, असा स्पष्ट आरोपही सतीश जारकीहोळी यांनी केला. तसेच जनतेने त्याकडे जास्त लक्ष देऊ नये असे आवाहनही केले. नगरसेवक मारहाण प्रकरणात काँग्रेस राजकारण करत असल्याचा भाजपचा आरोप आहे, त्यावर तुमचे मत काय? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना भाजप सुद्धा राजकारण करत असून गरज नसताना त्यांनी पोलीस ठाण्यासमोर धरणे धरले होते. त्यांचे बघून समितीनेही धरणे धरले. याउलट काँग्रेसने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही किंवा याबाबतीत कोणते राजकारणही केलेले नाही, असे जारकीहोळी यांनी सांगितले.Satish jarkiholi

खाऊ कट्ट्यामधील दुकान गाळे गोरगरीब व दिनदलितांना देण्याचा कायदा आहे. मात्र या खाऊ कट्ट्यामधील दुकाने इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना, मर्सिडीज बेंज गाडी असणाऱ्यांना, सोन्याच्या दागिन्यांची दुकाने असलेल्यांना एकंदर लाखो करोडोची मालमत्ता असलेल्यांना वाटण्यात आली आहेत. खाऊ कट्ट्या मधील सर्व 54 दुकान केवळ एका पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांना देण्यात आली आहेत स्थानिक पातळीवरील कोणत्याही राज्यस्तरीय वर्तमानपत्रात जाहिरात न देता खाऊ कट्ट्यामधील दुकान गाड्यांचा लिलाव करण्यात आला आहे त्यामुळेच सध्या खाऊ कट्ट्याची चौकशी सुरू आहे, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

त्या आमदारांच्या कार्यकाळात केवळ सोशल मीडियावर पोस्ट टाकली म्हणून कार्यकर्त्यांची अट्रो सिटी टाकून कारागृहात रवानगी झाली होती अनेकांवर कारवाया झाल्या होत्या त्यावेळी बेळगावचे राजस्थान झाले होते का ? असा प्रतिप्रश्न उपस्थित करत बेळगावचे बिहार तेंव्हा नव्हते का? असा देखील टोला हाणला. बेळगावच्या अधिवेशनात अधिकाधिक चर्चा व्हावी विकासाचे प्रश्न सुटावेत अशीही भूमिका त्यांनी मांडली.

मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न विचारला असता आगामी अधिवेशनात मुख्यमंत्री बेळगावात येतील 4 डिसेंबर रोजी त्यावेळी त्यांनाच विचारा असे सांगितले. पत्रकार परिषदेत लक्ष्मणराव चिंगळे, विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.