बेळगाव लाईव्ह:बेळगाव विमानतळावरील नव्या अत्याधुनिक टर्मिनल इमारतीच्या बांधकामासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) नुकतीच निविदा जाहीर केली आहे. सदर टर्मिनल उभारणीसाठी सुमारे 265.05 कोटी रुपये खर्च येणार असून ज्यामध्ये 216.05 कोटी भांडवली बांधकाम खर्च आणि निर्वहन, देखभाल व दुरुस्तीचा 49 कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चाचा समावेश असणार आहे.
बेळगाव विमानतळाच्या अत्याधुनिक भव्य टर्मिनल इमारतीच्या उभारणीसाठी जवळपास 24 महिने किंवा 730 दिवसांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे. याखेरीज निर्वाहन देखभाल आणि दुरुस्तीसाठी अतिरिक्त 2555 दिवस देण्यात येतील. त्याचप्रमाणे कंत्राटदाराला 5 वर्षाचा वार्षिक
एकात्मिक करार व्यवस्थापन (एआयसीएमसी) आणि दोन वर्षाचा दोषोत्तर दायित्व करार (डीएलपी) करावा लागणार आहे. सदर प्रकल्पाची बोली प्रक्रिया आज सोमवार 27 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून ती येत्या 12 डिसेंबर 2023 रोजी समाप्त होणार आहे.
नियोजित अत्याधुनिक टर्मिनल इमारत आणि तिच्याशी संबंधित सुविधा अशा पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत की ज्यामुळे हवाई प्रवाशांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतील. उभारण्यात येणारी ही टर्मिनल इमारत पंचतारांकित दर्जाची असणार आहे.
ज्यामध्ये नवे प्रस्थान टर्मिनल असणार असून सध्याच्या टर्मिनलचे आगमन क्षेत्रात रूपांतर केले जाणार आहे. नवी टर्मिनल इमारत 4 एरोब्रीजनी सुसज्जित असणार असून ज्यामुळे गर्दीच्या वेळी जवळपास 2400 प्रवाशांची (येणारे 1200 व प्रस्थान करणारे 1200) वहिवाट सुरळीतपणे सुरू राहील. नवी टर्मिनल इमारत उभी करण्याबरोबरच या प्रकल्पांतर्गत पार्किंग एरिया, सर्व्हिस रोड, राष्ट्रीय महामार्गाकडून नवा अप्रोच रोड वगैरे अन्य विविध सुविधाही विकसित केल्या जाणार आहेत.
बेळगावचा भूगोल, महत्त्वाच्या खुणा, संस्कृती, कला, वास्तुविशारदा वगैरेंच्या स्थानिक संदर्भांचे प्रतिबिंब नव्या अत्याधुनिक टर्मिनल इमारतीच्या वास्तु विशारदेमध्ये पहावयास मिळणार आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर आगमन (अराईव्हल) आणि प्रस्थान (डिपार्चर) सुविधा उपलब्ध असणार असून त्याला जोडून प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या पोटमजल्याचे पॅसेंजर बोर्डिंग ब्रिजेस (पीबीबी) उपलब्ध असणार आहेत.
तळमजल्यावरच चेकइन हॉल, पॅसेंजर स्क्रीनिंग आणि सिक्युरिटी होल्ड एरिया (एसएचए) रिटेल /कन्सेशन एरिया आणि इतर प्रवासी सुविधा उपलब्ध असणार आहेत. याबरोबरच पहिल्या मजल्यावर बोर्डिंग साठी पीबीबी एरोब्रिजची सोय असणार आहे.