Friday, December 27, 2024

/

रमेश पाटील यांच्या सुटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर धरणे

 belgaum

बेळगाव लाईव्ह:भाग्यनगर प्रभाग क्र. 42 चे नगरसेवक अभिजीत जवळकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक झालेल्या रमेश पाटील यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका करावी, या मागणीसाठी श्रीराम सेना हिंदुस्तान व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज रविवारी दुपारी टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून धरणे सत्याग्रह केला.

अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी रमेश पाटील यांच्यावरील भादवि कलम 307 मागे घेऊन नगरसेवक जवळकर यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर धरणे मागे घेण्यात आले.

मोबाईल टॉवर बसविण्याच्या वादातून भाग्यनगर येथे गेल्या गुरुवारी नगरसेवक अभिजीत जवळकर यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी काही भाजप नगरसेवकांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर धरणे धरले होते. मारहाण प्रकरणी पोलिसांनी भाग्यनगर येथील रमेश पाटील यांच्यासह दोघा जणांना ताब्यात पुढील कारवाई केली होती.

तथापि रमेश पाटील यांच्यावर नोंदविण्यात आलेले गुन्हे खोटे असल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आज गुरुवारी दुपारी टिळकवाडी पोलीस ठाण्यासमोर धरणे धरले. तसेच रमेश पाटील यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत अशी जोरदार मागणी केली.

यावेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांकडून नगरसेवक जवळकर यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्याबरोबरच शिवरायांचा जयजयकार केला जात होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन कोंडुसकर यांच्यासह आंदोलन करणाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

तथापि त्या सर्वांनी जोपर्यंत रमेश पाटील यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका केली जात नाही किंवा तेच गुन्हे नगरसेवक जवळकर यांच्यावर दाखल केले जात नाहीत तोपर्यंत आपण जागेवरून हलणार नाही असा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी रमेश पाटील यांच्यावरील भादवि कलम 307 मागे घेऊन नगरसेवक जवळकर यांच्यावर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यामुळे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात रणजीत चव्हाण -पाटील वगैरे समिती नेत्यांचाही सहभाग होता.Srs hindusthan

धरणे आंदोलनाच्या ठिकाणी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, भाग्यनगर येथील सर्वसामान्य नागरिक रमेश पाटील हे आपल्या घरावर टॉवर बसवत आहेत. त्यांच्या घरी जाऊन स्थानिक नगरसेवक जवळकर यांनी त्यांना टॉवर का बसवतोस? असा जाब विचारून दादागिरी करत मारहाण केली. या मारहाणीत स्वतःलाही दुखापत करून घेतलेल्या नगरसेवकाने हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन रमेश पाटील यांच्या विरोधातच पोलिसात तक्रार करून खोटे गुन्हे दाखल केले आहेत. आपल्या प्रभागातील गटारी, रस्ते, पाणी वगैरेंच्या समस्या सोडवणे. लोकांना एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तो दूर करणे, हे नगरसेवकाचे काम असते. एखाद्या गोष्टीच्या परवानगीची वगैरे कागदपत्रे विचारण्याचा अधिकार नगरसेवकांना नाही. शहरातील कांही प्रभागांमध्ये सध्या अनेक गैरप्रकार होत आहेत. मात्र त्याकडे लक्ष देण्याऐवजी भाजपचे हे नगरसेवक स्वतःच भ्रष्टाचारामध्ये गुंतले आहेत. रमेश पाटील यांच्या बाबतीत स्थानिक आमदारांचे ऐकूनच या भ्रष्ट नगरसेवकांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करून पोलिसांवर दबाव आणण्याचं काम केले आहे असे सांगून आज मी पोलीस ठाण्यासमोर येऊन बसलो आहे. उद्या जर नाटक कराल तर तुमच्या प्रत्येकाच्या घरासमोर येऊन बसेन. तुम्हाला घराबाहेर पडणे, शहरात फिरणे आम्ही मुश्किल करू हे लक्षात ठेवा असा इशारा कोंडुसकर जवळकर यांच्यासह संबंधित सर्व नगरसेवकांना दिला.

तुम्ही नगरसेवक आहात तर नगरसेवकाची जी कामे आहेत तीच करा. आपण ज्या सामान्य मराठी माणसाच्या मतावर निवडून आलो आहोत त्यांची काळजी घेणे, त्यांना त्रास होणार नाही हे पाहणे नगरसेवक या नात्याने जवळकर यांचे कर्तव्य आहे. मात्र स्थानिक आमदारांचे ऐकून त्यांना त्यांच्या कर्तव्याचा विसर पडला आहे, नको ती काम ते करत आहेत. जवळकर यांचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढला आहे. त्यांच्याकडून दहा -एक अपार्टमेंट्स बांधली जात असून ती सर्व बेकायदेशीर आहेत. एकही अपार्टमेंट नियमानुसार बांधलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. तेंव्हा रमेश पाटील यांच्यावर 307 कलमान्वये दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा अथवा तसाच गुन्हा नगरसेवक जवळकर यांच्यावरही नोंदवला जावा. आमची ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असे कोंडुसकर यांनी सांगितले. येथील एसीपीना देखील माझा सवाल आहे की त्यांनी कोणत्या आधारावर रमेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे? खरंतर एसीपींनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करावयास हवा होता. जवळकर आणि पाटील या दोघांचीही चौकशी व्हावयास हवी होती. या पद्धतीने एकावरच अन्याय केला जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.