बेळगाव लाईव्ह विशेष :मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची नुकतीच बैठक पार पडली. विषय होता, कर्नाटक शासनाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे होणार असल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती दरवेळी सीमा बांधवांचा महामेळावा घेते त्याचे नियोजन.
गेली 67 वर्षे अस्मितेचा लढा लढणाऱ्या मराठी माणसाला आपली एकजूट आपली ताकद आपला आत्मसन्मान दर्शवण्यासाठी अनेक मार्ग अवलंबवावे लागतात. त्यातलाच महामेळावा हा एक भाग. बैठक महामेळाव्याची मात्र कवित्व रंगले ते नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत घडलेल्या गुप्त आर्थिक व्यवहाराच्या घडामोडीचे.अर्वाच्यशिव्या, हमरातुमरी हातवारे करून एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, सगळं काही घडलं या बैठकीत.
तालुका समितीचे खजिनदार आणि माजी आमदार यांच्यात तुंबळ युद्धाचा समर प्रसंग उपस्थिताना अनुभवावयास मिळाला, त्याची चित्रफित संपूर्ण सीमा भागात मुक्तपणे फिरत राहिली आणि मराठी माणसाच्या मनास जीवघेणी कळ सोसावी लागली.
आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही म्हणून घोषणा केलेले आणि राजहंस गडावर छ्त्रपती शिवराया समोर शपथ घेऊन मराठी माणसाला एकनिष्ठतेचे धडे दिलेल्या नेत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला? याचा उलगडा मात्र यातून झाला. आपल्या उमेदवारीला पैशाचे पाठबळ मिळावे यासाठी त्या माजी आमदाराने काही जणांना गोकाकला धाडले होते आणि आर्थिक व्यवहार जमवून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दक्षिण मतदार संघातून आपणच उमेदवार व्हायचे असे ठरवले होते.
जनमानसातून आलेले रमाकांत कोंडुस्कर सारख्या तगड्या उमेदवाराला खो घालायचा आणि आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करून घ्यायचे असा एक कलमी कार्यक्रम यात निश्चित करण्यात आला होता. जे कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे घडलेच नाही. मात्र तालुका समिती खाजिनदाराच्या आरोपामुळे ते माजी आमदार आजवर कोणत्या पद्धतीचे राजकारण करत आलेले आहेत हे लोकांच्या समोर आले.
ग्रामीणच्या राजकारणात आजवर दबक्या आवाजात त्या माजीच्या कार्यपद्धतीवर चर्चा रंगत असली तरी त्यांच्या राजकीय खेळातील कोणी साथीदाराने याला दुजोरा दिला नव्हता मात्र यावेळी मन्नूर च्या नेत्याने खुल्यापणाने त्या माजी आमदाराचे वाभाडे काढले. मध्यवर्तीच्या खाजिनदाराने याप्रसंगी दोघांना अडवताना जे वाक्य उच्चारतात त्यात समितीच्या एकंदर राजकारणाची गोम दडली आहे. ते म्हणतात “तुमच्यामध्ये मी मध्यस्थी केली असती तर लोकांनी आमचे कपडे काढले असते”. याचा अर्थ काय आणि यात काय घडले आहे याचा उलगडा समस्त सीमा वासियांना झाला.
महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढवते ती लोकेच्छा दर्शवण्यासाठी आणि आपला सीमाभागातील हक्क दिल्ली पर्यंत पोचवण्यासाठी. मराठी माणूस आपल्या घामाचे पदरचे पैसे घालून मराठी उमेदवाराला मदत करतो मराठी आयाबाया मराठी उमेदवार निवडून यावा यासाठी देवापुढे पदर पसरतात. म्हातारी माणसे वयाचा विचार न करता थकल्या पायांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतात. अपंग लुळे पांगळे कष्टकरी शेतकरी डोळ्यात आशा ठेऊन असतात की मराठी माणूस निवडून यावा. हजारोंच्या होणाऱ्या सभा,भरगच्च प्रचार यात्रा ” कोण आला रे…. कोण आला… समितीचा वाघ आला” अश्या दणाणून जाणाऱ्या घोषणा हे सगळं विरून जिरून जाते. ते या करंट्या उपराच्या काळजाच्या स्वार्थी नेत्यांमुळे.मराठी माणसाला कळतच नाही की कधी त्याचा घात केला गेला. सगळ जुळून आलेलं गणित चुकलचं कसं? याचे उत्तर आहे हे कोट्यधीश झालेले स्वार्थी नेते जे आजवर मराठी माणसाचा घात करत आलेत.
जोशात आलेला प्रचार अचानक थंड कसा पडतो?हजारोच्या संख्येमधील मतदार जातो कुठं?तिकीट मागताना आघाडीवर असणारा उमेदवार चालू प्रचारातून अचानक घर कोंबडी बनून प्रचारातून विरक्ती कसा घेतो? त्याच उत्तर तालुका समितीच्या खजिनदारानी समाजापुढे मांडल आहे.गेली 30 वर्षे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झारीतील शुक्राचार्य बनलेल्या नेत्यांचे पितळ उघडे पडले आहे.
तीन वेळा ग्रामीण मधून निवडणूक लढूवूनही दक्षिणेत परत तिकीट मागणाऱ्या त्या माजी आमदाराचा इरादा काय होता ते लोकांसमोर आलेच आहे.येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत हेच नेते मोठे घबाड मिळवण्याच्या नादात आहेत.विधान सभेच्या निवडणुकीतील यांच्या पोळीवरचे तूप अजूनही वाळले नाही तोपर्यंत खासदारकीच्या निवडणुकीतील मलईचा त्यांना ध्यास लागला आहे. मराठी माणसाला गृहीत धरून राजकारण करणाऱ्या या राजकारण्यांची समाजाला किळस आली आहे.
( क्रमशः)
समाज माध्यमातून फिरणारे दोन vdo आम्ही जनतेसमोर आणत आहोत जनता यातून हवा तो बोध घेईल.