Friday, January 3, 2025

/

अधिवेशनाच्या तयारीला लागा; डीसींची अधिकाऱ्यांना सूचना

 belgaum

बेळगाव लाईव्ह :विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबरमध्ये होणार असून अधिवेशनाची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी अधिकाऱ्यांनी अधिवेशनाच्या पूर्वतयारीला लागावे, अशी सूचना जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.

कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल मंगळवारी पार पडलेल्या अधिवेशन पूर्वतयारीच्या बैठकीत जिल्हाधिकारी पाटील अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी निवास समिती, आहार समिती, आवश्यक वस्तू खरेदी आणि मुद्राण समिती, परिवहन आणि इंधन समिती, आरोग्य समिती, पास वितरण समिती, तक्रार निवारण समिती वगैरे समित्यांची रचना करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांनी नियुक्त समित्यांनुसार पूर्वतयारीची बैठक घेऊन अधिवेशनाच्या तयारीला लागावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी नितेश पाटील यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधी अधिकारी माध्यम प्रतिनिधी यांची राहण्याची आणि मान्यवरांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. डिसेंबर महिन्याच्या प्रारंभापासूनच कोणत्याही हॉटेल मालकाने इतर ग्राहकांसाठी खोल्या आरक्षित करू नयेत असेही त्यांनी सांगितले. तसेच अधिवेशनाला 4 डिसेंबर पासून सुरुवात होण्याची शक्यता असली तरी अद्याप लेखी स्वरूपात निश्चित तारीख कळविण्यात आली नाही.

त्याबाबत 6 नोव्हेंबर नंतर स्पष्टीकरण मिळेल. शेवटच्या क्षणी तारखेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच मागील वेळी प्रमाणे हॉटेल व्यवसायिकांची बिले यावेळीही वेळेवर अदा केली जातील, असे त्यांनी सांगितले. शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी सरकारचे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपापली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडून सहकार्य करावे, असे आवाहन करण्याबरोबरच अधिवेशन काळात योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

बैठकीस जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला आदी प्रमुख अधिकाऱ्यांसह विविध खात्यांचे अधिकारी, हॉटेल व लाॅज मालक आणि त्यांचे व्यवस्थापक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.