बेळगाव लाईव्ह:बेळगावची हॉकी परंपरा मजबूत करण्यासाठी बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेने पुढाकार घेतला असून शालेय विद्यार्थीनीत हॉकी खेळाची आवड निर्माण करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे.
बेळगावचे अनेक हॉकी खेळाडू भारतीय ऑलिम्पिक विजेत्या हॉकी संघात होते त्यापैकी कै. बंडू पाटील हे नाव अग्रक्रमाने घेता येईल. बेळगावच्या हॉकीचा दबदबा देशात होता तो नाव लौकिक परत मिळवण्यासाठी हॉकी संघटनेच्या शहरातील शाळे मधून शाळकरी मुलींना हॉकी स्टिक वाटप करण्यात येत आहेत.
चव्हाट गल्ली येथील जिजामाता हायस्कूल मधील मुलींना हॉकी स्टिक देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक एन डी पाटील होते यावेळी हॉकी संघटनेचे सचिव सुधाकर चाळके, विकास कलघटगी ‘उत्तम शिंदे, गणपत गावडे, संतोष दरेकर शिवाजी जाधव, राजेंद्र पाटील प्रफुल काळोजी फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र डिसोजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडाशिक्षिका जी. एस मंडोळकर यांनी केले. अध्यक्ष पदावरून बोलताना हॉकी म्हणजे भारत व भारत म्हणजे हॉकी असे हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांनी साऱ्या जगाला दाखवून दिले होते. जिवनात यशस्वी होण्यासाठी खेळाला महत्व द्या असे विचार मांडले.
हॉकीबद्दल मार्गदर्शन करताना विकास कलघटगी यांनी खेळामुळे तणाव दूर होतो व अभ्यासात एकाग्रता येते. या संधीचा फायदा विद्यार्थिनीनी घ्याव असे अवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती अंजली चव्हाण यांनी केले.
एकीकडे बेळगाव शहरासाठी अस्ट्रो टर्फ हॉकी मैदानासाठी पाठपुरावा करणाऱ्या जिल्हा हॉकी संघटनेकडून विद्यार्थिनीना हॉकी स्टिक देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद म्हणावा लागेल.