Sunday, September 15, 2024

/

शेतकरी भवनासाठी राष्ट्रीय रयत संघाचे आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकासमोरील इमारत दीर्घ मुदतीच्या भाडेतत्त्वावर (लीज) शेतकरी भवनासाठी देण्यात आली असल्यामुळे ती इमारत तात्काळ पूर्ववत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय रयत संघातर्फे आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्यात आला.

बेळगाव मध्यवर्ती बसस्थानका समोरील इमारत सरकारने चार दशकांपूर्वी शेतकरी भवनासाठी दीर्घ मुदतीच्या भाडे करारावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देऊ केली होती. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या बैठका व इतर कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने सोयीचे जावे यासाठी ही इमारत शेतकऱ्यांकरिता देण्यात आली होती. मात्र कालांतराने ही इमारत शेतकऱ्यांसाठी न राहता अन्य कारणांसाठी वापरात येऊ लागली. सदर इमारत शेतकऱ्यांसाठी उपयोगात यावी यासाठी कोणतेच प्रयत्न न झाल्यामुळे अलीकडच्या काळात या इमारतीमध्ये अनेक गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप आहे.

यासंदर्भात आवाज उठवताना राष्ट्रीय रयत संघातर्फे आज गुरुवारी सकाळी किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रवेशद्वारात धरणे आंदोलन छेडण्यात आले यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी असणारे शेतकरी भवन शेतकऱ्यांनाच उपलब्ध करून देण्यात यावे अशी जोरदार मागणी करण्यात आली. तसेच मागणीची तात्काळ पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय रयत संघाच्या नेत्यांनी दिला.Farmers

या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना कर्नाटक राज्य रयत संघ राज्य कार्याध्यक्ष सुजित पवार म्हणाले की, सरकारचा हिवाळी अधिवेशन येत्या 4 डिसेंबरपासून सुरू होत आहे. ऊस दराबाबत आमचे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यात भर म्हणजे बेळगाव जिल्ह्यात दुष्काळ पडला आहे. अशा परिस्थितीत हिवाळी अधिवेशन शेतकऱ्यांसह सर्व सामान्य नागरिकांसाठी असताना राज्याचे मंत्री, आमदार अधिवेशनाच्या नावाखाली बेळगावात येऊन हजारो -कोटी रुपयांची उधळपट्टी करतात. हे सर्वजण शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्या वाढवण्यासाठी बेळगावला येतात.

आज शेतकऱ्यांच्या ऊस दराचा प्रश्न आहे सोयाबीनला दर मिळत नाही. पावसाअभावी पिकं वाळून गेली आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याऐवजी दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांचे जे शेतकरी भवन आहे ते शेतकऱ्यांना वापरण्यास देण्याऐवजी अधिवेशनासाठी येणाऱ्यांकरता त्या ठिकाणी दारूचा बार उघडण्यासह अन्य गैरप्रकार सुरू आहेत. सदर गैरप्रकार तात्काळ थांबून शेतकरी भवन शेतकऱ्यांना वापरण्यास दिले गेले पाहिजे असे सांगून हे भवन जोपर्यंत शेतकऱ्यांच्या ताब्यात दिले जात नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन थांबवणार नाही असे सुजित पवार यांनी स्पष्ट केले. शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी कर्नाटक सरकारने 1963 मध्ये बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकासमोरील इमारत दीर्घ मुदतीच्या भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांसाठी ‘रयत भवन’ म्हणून दिली होती असे सांगून आपले परखड मत व्यक्त केले तसेच सरकारने सदर इमारत तात्काळ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.