बेळगाव लाईव्ह:गरजू सर्वसामान्यांना तसेच गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळावेत यासाठी असलेल्या बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तेथील कांही कंत्राटी कर्मचारी रुग्णांच्या नातलगांकडून पैसे उकळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
यासंदर्भात माजी नगरसेवकांनी आवाज उठवताच बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांनी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा आदेश दिला आहे.
सरकारकडून मोफत उपचार उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप वारंवार केला जातो. तेथील कांही कर्मचारी उपचारासाठी तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडे पैसे मागत असल्याच्या तक्रारी अलीकडे वाढल्या आहेत.
अशीच तक्रार कांही लोकांनी अनगोळ येथील माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्याकडे केली होती. सिव्हिल हॉस्पिटल मधील प्रसूती विभागात गैरप्रकार सुरू असून प्रसुती शस्त्रक्रियेसाठी पैशाची मागणी केली जात आहे. त्या संदर्भातील मोबाईलचे ऑडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे असे त्या तक्रारदारांनी सांगितले. सदर तक्रार गुंजटकर यांनी माजी महापौर विजय मोरे यांच्या कानावर घातली. तेंव्हा त्यासंदर्भात विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आज गुरुवारी थेट बिम्सचे संचालक डाॅ. अशोककुमार शेट्टी यांची भेट घेतली. तसेच घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यावेळी डॉ. शेट्टी यांनी प्रसूती विभागाचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तात्काळ बोलावून घेऊन पैशाची मागणी करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांबद्दल माहिती घेतली.
तसेच मोबाईलचे ऑडिओ रेकॉर्डिंग तपासले असता कंत्राटी कर्मचारी डॉक्टरांचे नाव सांगून पैशाची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले. तेंव्हा सदर बाब गांभीर्याने घेत संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांनी तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीचा आदेश दिला. त्याचप्रमाणे याप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल आणि हॉस्पिटलमध्ये पैसे उकळण्याच्या कृत्यात सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन डाॅ. शेट्टी यांनी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी माजी महापौर विजय मोरे यांच्यासह माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, सुनील बाळेकुंद्री, दीपक जमखंडी, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आदी उपस्थित होते.
बिम्स संचालकांना भेटल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना माजी महापौर विजय मोरे म्हणाले की, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कांही अडचणी आल्यास गरीब गरजू लोक आमच्याशी संपर्क साधत असतात. त्यानुसार कांही लोकांनी विनायक गुंजटकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी काल माझ्याशी संपर्क साधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पैसे मागितले जात असल्याची तक्रार आली असल्याचे सांगितले. योगायोगाने नेमक्या त्यावेळी मी सिव्हिल हॉस्पिटल मध्येच होतो. त्यामुळे मी त्या ठिकाणी चौकशी सुरू करताच येथील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर पैशाची मागणी केली जात आहे अशी ज्यांची तक्रार होती त्यांच्याकडून माहिती जाणून घेतल्यानंतर आज आम्ही बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलच्या संचालकांची भेट घेऊन घडत असलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल अथवा तेथे काम करत असलेल्या डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांबद्दल काहींच बोलायचे नाही. कारण त्यांच्याकडून उत्तम रुग्णसेवा दिली जात आहे. मात्र त्यांच्या नावाने मध्यस्थ मंडळी पैसे खात असतील तर ती गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घालणे हे आमचे कर्तव्य समजून आम्ही सर्वजण आज हॉस्पिटलचे संचालक डॉ. शेट्टी यांना भेटलो. त्यांच्या कानावर सर्व प्रकार घातला. त्याची गांभीर्याने दखल घेत डॉ. शेट्टी यांनी संबंधित दोघा कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या एजन्सीच्या लोकांना बोलून घेऊन त्यांची चांगली कान उघडणी केली तसेच त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत त्यांना त्यांच्या एजन्सीकडे परत धाडण्याचा निर्णय घेतला.
सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या बाबतीत आमचा कोणताही आक्षेप नाही, मात्र या पद्धतीने मध्यस्थ लोकांकडून सर्वसामान्य जनतेला लुबाडण्याचा जो प्रकार घडत आहे तो आम्ही खपवून घेणार नाही. यापुढे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार जर निदर्शनास आला तर संबंधितांना चांगला धडा शिकविला जाईल. सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टरांनाही माझी विनंती आहे की त्यांच्या निदर्शनास असा कांही प्रकाराला तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.
आम्ही संबंधितांचा बंदोबस्त करू. सहकार्य करायला पोलीस प्रशासन देखील आहे. त्याचप्रमाणे समस्त जनतेने देखील याची नोंद घ्यावी आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासंदर्भात कोणी पैशाची मागणी केल्यास आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी महापौर विजय मोरे यांनी केले.