बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहराच्या रेल्वे संपर्काचे जाळे अधिक विस्तारण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच बेळगाव ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी देखील माझे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात लवकरच ही सेवाही मिळेल अशी माहिती विधान परिषदेचे सदस्य आणि कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी -2 प्रकाश हुक्केरी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.
बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे केवळ हुबळीपर्यंत धावत होती. मात्र आता रेल्वे खात्याने वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार बेळगावपर्यंत केल्यानंतर बेळगाव रेल्वे संबंधी रखडलेली पकडलेल्या कामांना चालना मिळालेली आहे असेच म्हणावे लागेल. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधना नंतर नवीन रेल्वेगाड्या सुरू करणे असो किंवा रेल्वेशी संबंधित इतर कामे असोत ती शिथील झाली होती. मात्र आता वंदे भारत एक्सप्रेसच्या निमित्ताने का होईना पुन्हा एकदा रेल्वे खात्यांने बेळगाववर लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश हुक्केरी बोलत होते.
बेळगाव शहराच्या रेल्वे संपर्काचे जाळे विस्तारण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलण्यात येणार आहेत. आता लवकरच बेळगाव -पुणे ही इंटरसिटी रेल्वे आपण सुरू करणार आहोत. त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत. बेळगाव जिल्ह्याचा सदस्य या नात्याने बेळगाव जिल्ह्यासाठी रेल्वे व हवाई सेवा किंवा केंद्र सरकारच्या इतर योजना अंमलात आणल्या जातील. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू असून त्या दृष्टीने पाठपुरावा केला जात आहे असे सांगून बेळगाव -पुणे दरम्यानची नियोजित इंटरसिटी रेल्वे या दोन्ही शहरांसाठी फायद्याची ठरणार आहे, असे मत हुक्केरी यांनी व्यक्त केले.
बेळगावचे पुण्याशी जुने नाते आहे जिल्ह्यातील असंख्य लोकांचे मुंबईनंतर सर्वाधिक येणे जाणे पुण्याला असते. बेळगावच्या लोकांची नोकरी व कामधंद्यासाठी पुण्याला नेहमी ये -जा सुरू असते. या सर्वांसाठी इंटरसिटी रेल्वे हा सोयीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी बेळगाव -पुणे दरम्यान दररोज इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रकाश हुक्केरी प्रयत्नशील आहेत.
या संदर्भात त्यांनी नैऋत्य रेल्वे कडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे. आता इंटरसिटी रेल्वेसाठी मध्य रेल्वेकडून परवानगी मिळणे बाकी आहे त्यासाठी प्रकाश हुक्केरी यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असून मुश्रीफ यांनी देखील मध्य रेल्वेला पत्र दिलेले आहे. एकंदर मध्य रेल्वे आणि नैऋत्य रेल्वे यांचा समन्वय साधून लवकरच बेळगाव -पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. लवकरच रेल्वे मंत्री अथवा रेल्वे बोर्ड चेअरमन यांच्याशी दिल्लीत संपर्क साधणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
बेळगावहून पुण्याची विमान सेवा प्रलंबित आहे. त्यासाठी देखील आम्ही आग्रही मागणी केली असून मागील महिन्यात आम्ही केंद्रीय नागरी विमान उड्डाण खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली होती. एकूणच बेळगावची विमान सेवा असो वा रेल्वे सेवा त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असल्याचे प्रकाश हुक्केरी यांनी स्पष्ट केले.