बेळगाव लाईव्ह :शेतकरी आणि शेती व्यवसायाला वाचविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना शेतीकडे वळविण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरू सेनेने सरकारकडे केली आहे.
कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरु सेनेतर्फे आज सकाळी शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडून सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
आपल्या मागणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमाना माहिती देताना आप्पासाहेब देसाई म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणून केंद्र सरकारची जी योजना आहे. ती शेतीकडे वळविण्यात यावी अशी आमची मागणी आहे. यापूर्वी देखील आम्ही बऱ्याचदा ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे, मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांकडे केली आहे. मात्र आमच्या या मागणीची अद्यापपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही.
आमच्या मागणीला कचऱ्याची टोपली दाखविण्यात येत असल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना काही किंमत आहे की नाही? देशात लोकशाही आहे म्हंटले जाते. मात्र आम्हाला ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते ते पाहता आम्ही मनुष्य आहोत की नाही? अशी शंका आम्हालाच येऊ लागली आहे. सरकारच्या रोजगार हमी योजनेमध्ये काम केल्यास दिवसाला 300 -400 रुपये मिळतात. शेतकऱ्यांना तितके पैसे देणे परवडत नाही. त्यामुळे त्यांच्या शेतात काम करणारे स्त्री -पुरुष शेतमजूर रोजगार हमी योजनेकडे वळले आहेत.
परिणामी शेतात काम करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता निर्माण होत आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तेंव्हा शेतकरी आणि शेती व्यवसायाला वाचवण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना शेती व्यवसायाला जोडली गेली पाहिजे.
दुसरीकडे ही योजना म्हणजे कांही लोकांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे असा आरोप करून रोजगार हमी योजनेच्या पैशाचा व्यवस्थित विनीयोग व्हावयाचा असेल तर ही योजना शेतीकडे वळविणे काळाची गरज आहे, असे मत आप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केले.