बेळगाव लाईव्ह :ठेवीदारांच्या जीवावर जमलेल्या रक्कमेतून कर्जे देताना मलिदा खाऊन कमाविलेली माया संस्थेला घातक आणि वैयक्तिक समृद्धीला फायदेशीर कशी होते याची अनेक उदाहरणे सध्या संबंधित सहकारी संस्थेच्या भ्रष्ट संचालकांकडे पाहिल्यास लक्षात येतील. अशी अनेक प्रकारणे बाहेर पडत आहेत. यामुळे समोर समाज उन्नतीचा चेहरा समोर ठेऊन इतरांच्या पैशांवर स्वताची भर हे समीकरण उघड होत आहे.
येथील अनेकांनी एकीकडे संचालकपद सांभाळत स्वतः आणि स्वतःच्याच कुटुंबाला नोकऱ्या देऊन दुहेरी मार्गाने पैसे छापले आहेत, हे तर उघड आहेच. शिवाय इतर मार्गाने होणारी कमाई वेगळीच आहे. हा प्रवास इतर अनेक फसव्या प्रकरणांसारखाच आहे. संस्थेशी केलेले स्कॅम आहे. यावर आता चर्चा सुरु झाल्या आहेत. आम्ही तेवढेच मल्टीस्टेट नाही इतरही आहेत की, ते दिसत नाहीत काय असे म्हणत ठेवीदारांना फसवण्याचे व्यवहार आणखी किती दिवस चालणार हे येणारा काळ ठरविणार आहे.
एक आरामदायी गादी खरेदी करायचे आणि आपल्या हाताखाली आणखी ओळखीच्या मंडळींना गादया खरेदी करायला लावायच्या. या प्रत्येकाला शांत झोपेचे स्वप्न दाखवून कमिशन खायचे अशी एक फसवी योजना मध्यंतरी येऊन गेली. यात अनेकांचे हात, पाय पोळले आणि घरे विकायला लागली. पण संबंधित संस्थेच्या संचालकांपैकी काहींनी या स्कीम मध्ये स्वताची भर मोठ्याप्रमाणात कशी करून घेतली आणि आपल्या संस्थेला आणि संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या गोर गरिबांना कसे भिकेला लावले हे आता नव्याने चर्चेला आले आहे.
संस्थेत छोट्या मोठ्या पिग्मी भरणाऱ्यांना ९० हजाराचे कर्ज देऊन ती गाडी घ्यायला लावायची आणि त्यावर आपण बक्कळ म्हणजेच प्रत्येकी ५० हजार कमिशन खायचे असे प्रकार करून अनेकजण गब्बर झाले. कर्ज माथ्यावर मारले गेल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला आणि गादीवर झोपून आराम काही मिळाला नाही. यामुळे वसुलीला जाणाऱ्यांच्या मागे कर्जदार कोयते घेऊन मागे लागले होते. अशाप्रकारे संचालक १०० टक्के कमिशन घेऊन मोकळे जाळे, वसुलीवाले जीव मुठीत घेऊन पळाले आणि ५० टक्केही वसुली न झाल्याने संस्था तोटा सहन करून शांत बसली. हे प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेला आले आहे.
एका फौंड्रीत काम करणारा संस्थेचा वरिष्ठ आता कसा गब्बर झाला आहे, याचीही चर्चा सुरु झाली आहे. आपण पुढील भागात त्याबद्दल वाचणार आहोत. संस्थेच्या पैशांचा आणि कमिशनचा वापर करून जागा घ्यायच्या, त्या प्रचंड मोठ्या रकमेला विकायच्या आणि त्यापुढे जाऊन आता तयार बंगले अर्थात रो हाऊसिस बांधून विक्री करायची… याचा फायदा जर संस्थेला झाला असता तर कुणालाच त्याची चर्चा करण्याची गरज पडली नसती. मात्र ठेवीदारांच्या जीवावर झालेला काळाबाजार उघड झाल्याने चर्चा होऊ लागली आहे. (क्र. म. श. )