बेळगाव लाईव्ह:बेळगाव महानगरपालिकेकडे कंत्राटी तत्त्वावर कार्यरत एकूण 155 पौरकार्मिकांची महापालिका कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
बेळगाव महानगरपालिकेतील रिक्त असलेल्या एकूण 155 पौरकार्मिकांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार अर्ज तपासणी समितीकडे एकूण 468 उमेदवारांचे अर्ज आले होते. या उमेदवारांपैकी छाननीअंती 155 जणांची महापालिकेत कायमस्वरूपी नियुक्तीसाठी निवड करण्यात आली.
या निवडीवर गेल्या शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय निवड समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेतील कंत्राटी व इतर करारांच्या आधारावर सेवा बजावणाऱ्या 155 पौरकारमिकांची कर्नाटक म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्यांतर्गत थेट नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेच्या रोस्टर नियमानुसार पात्रता धारक कर्मचाऱ्यांची तात्कालीक यादी जाहीर करण्यात आली आहे. सदर यादी जाहीर झाल्यानंतर येत्या 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत यादी बाबत आक्षेप नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आक्षेप नोंदवणाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मनपायुक्तांकडे आपले आक्षेप नोंदवावेत असे जिल्हाधिकारी पाटील यांनी सुचित केले आहे. या संदर्भात आवश्यक कागदपत्रांची छाननी करून स्पष्ट शेरा निश्चित केलेल्या नमून्यामध्ये महापालिका आयुक्तांनी दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा.
त्यानंतर येणाऱ्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही असेही जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.