बेळगाव लाईव्ह :वेतन आणि निवृत्ती वेतन सुधारणेच्या मागणीसाठी बीएसएनएलच्या जॉईंट फोरम ऑफ नॉन एक्झिक्यूटिव्ह युनियन अँड असोसिएशनतर्फे आज सकाळी मानवी साखळी करून आंदोलन छेडण्यात आले.
वेतन आणि निवृत्तीवेतनात सुधारणा करण्यात यावी. त्याचप्रमाणे एनईपीपी बदलण्यात यावे. या आपल्या मागणांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जॉईंट फोरम ऑफ नॉन एक्झिक्युटिव्ह युनियनस अँड असोसिएशन ऑफ बीएसएनएलतर्फे आज मंगळवारी सकाळी शहरातील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालय समोर मानवी साखळी करून आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या आजी-माजी कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. आपल्या मागण्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना एका आंदोलनकर्त्याने सांगितले की, गेल्या 1 जानेवारी 2017 पासून आमचे वेतन आणि निवृत्तीवेतनात सुधारणा झालेली नाही. त्याचप्रमाणे एनईपीपी बदलण्यात आलेले नाही.
सरकारी करारानुसार ते 10 वर्षातून एकदा बदलले गेले पाहिजे होते. मात्र आजपर्यंत तसे घडलेले नाही. या संदर्भात आम्ही गेल्या पाच वर्षापासून लहान-मोठी आंदोलन करून आवाज उठवत आहोत. मात्र सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आज आम्ही मानवी साखळीद्वारे पुन्हा एकदा आंदोलन छेडले आहे. आजपर्यंत अनेक मंत्री आले, बैठका झाल्या, त्यांनी आम्हाला आश्वासने दिली.
मात्र अजूनपर्यंत वेतन अथवा निवृत्ती वेतनात वाढ झालेली नाही. निवृत्ती वेतनात वाढ न झाल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. तेंव्हा आमची सरकारकडे मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला थर्ड पीआरसी रिव्हीजन द्यावे.
त्याचप्रमाणे बीएसएनएल चा विकास व्हायचा असेल तर सरकारने 4जी आणि 5जी अंमलात आणून लवकरात लवकर बीएसएनएलचे पुनरुज्जीवन करावे. बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या आजच्या मानवी साखळी आंदोलनात बऱ्याच कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.