बेळगाव लाईव्ह :नको असलेले, गाडलेले मुद्दे विनाकारण उकरून काढून त्यावर प्रसिद्धी माध्यमातून चर्चा करण्यात धन्यता मानणाऱ्या काँग्रेस सरकारचे राज्यातील ज्वलंत समस्यांकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप माजी पोलीस महासंचालक भास्करराव यांनी केला.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. विद्यमान काँग्रेस सरकारचे राज्यातील ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्यात विधानसभेच्या 136 जागा जिंकून बहुमत मिळालेल्या सत्ताधारी पक्षाला हाताळण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री नाखुश आहेत. सत्ताधारी पक्षासाठी ते एकच चालक नसून अनेक जण चालक आहेत.
प्रशासन आणि नेतृत्वाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सरकारी अधिकारी काम करायला तयार आहेत. परंतु त्यांना समर्थ राजकीय नेतृत्व मिळत नाही आहे. नैराश्य आलेले हे सरकार समस्यांना तोंड देण्यात असमर्थ ठरत आहे. दक्षिण कर्नाटकामधील कावेरी पाणी प्रश्नासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना खुश करण्याकरता स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताचा बळी दिला जात आहे. सर्वोच्च न्यायालय असू दे, कावेरी जलविवाद असू दे त्यांच्यासमोर या सरकारला वादविवाद करता येत नाही. कारण नसताना नको असलेले मुद्दे उकरून काढून त्यावर प्रसिद्धी माध्यमातून चर्चा करण्यात या सरकारला धन्यता वाटत आहे. नुकताच जो वाघ नखांचा वादग्रस्त मुद्दा चर्चेत आणण्यात आला खरं तर त्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे झालं काय तर ज्वलंत समस्यांवरील लक्ष विचलित झाले.
अत्यंत अयोग्य पद्धतीने गॅरंटी योजनांची अंमलबजावणी, ग्राउंड मॅनेजमेंट मधील अपयश योग्य प्रकारे वीज पुरवठा करण्यात अपयश भ्रष्टाचार आणि औद्योगिक क्षेत्राला मदत करण्यामध्ये अपयश या सर्वात मोठ्या समस्यांना कर्नाटक राज्य सध्या तोंड देत आहे, असे स्पष्ट करून राव यांनी सरकारच्या गॅरंटी योजनांमधील त्रुटींची माहिती दिली. सरकारने राज्यातील बेळगावसह कांही जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित केले असले तरी त्या अनुषंगाने उपाययोजना, नुकसान भरपाई वगैरेंसंदर्भात सरकारकडून कोणती हालचाल झालेली नाही.
सरकारची मदत मिळत नसल्यामुळे उद्योगधंदे बंद पडू लागले आहेत. बेळ्ळारी मधील एक नामवंत उद्योग यापूर्वी बंद झाला आहे. आता बहुतेक बेळगावच्या फाउंड्री उद्योगाचा क्रमांक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे भास्करराव शेवटी म्हणाले.