बेळगाव लाईव्ह :विणकारांच्या यंत्रमागांना 10 एचपीपर्यंत ‘शून्य’ रुपये आणि 20 एचपीपर्यंत सव्वा रुपये वीज बिल आकारले जावे या प्रमुख मागणीसह विणकारांच्या विविध मागण्या सरकारने येत्या 6 डिसेंबरपर्यंत मान्य न केल्यास ‘बेळगाव सुवर्ण विधानसौध चलो’ आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक राज्य विणकर सेवा संघ आणि राष्ट्रीय विणकर सेवा संघाने दिला आहे.
कर्नाटक राज्य विणकर सेवा संघाचे राज्याध्यक्ष शिवलीं टिदकी यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी उपरोक्त इशाराचे निवेदन आज शनिवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. राज्यातील विद्यमान सरकारने विणकारांसाठी 10 एचपीपर्यंत मोफत वीज आणि 20 एचपी पर्यंत सव्वा रुपये वीज बिल आकारले जाईल अशी घोषणा केली होती. मात्र त्याची आजतागायत अंमलबजावणी झालेली नाही.
घोषणा होऊनही वीज बील पूर्वीप्रमाणेच येत असल्यामुळे विणकारांनी गेल्या एप्रिलपासून विजेचे बिलच भरलेले नाही. तेंव्हा घोषणा केल्याप्रमाणे विणकारांसाठी गेल्या एप्रिलपासून 10 एचपीपर्यंत मोफत वीज आणि 20 एचपी पर्यंत सव्वा रुपये वीज बिल आकारले जावे. विणकारांना कामगारवर्गात समाविष्ट केले जावे आणि त्या अनुषंगाने त्यांना घरांची सवलत मिळावी. विणकारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सवलती मिळाव्यात.
वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्यात. केंद्र सरकारच्या विणकारांसाठी असलेल्या सवलती प्रलंबित असून त्या त्वरित दिल्या जाव्यात. निधन पावलेल्या विणकारांच्या कुटुंबीयांना सहाय्य धन दिले जावे वगैरे मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. सदर मागण्या संदर्भात भेटण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आम्हाला लवकरात लवकर निमंत्रित करावे. अन्यथा सरकारच्या येत्या डिसेंबर महिन्यात बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान म्हणजे 6 डिसेंबर 2023 रोजी ‘बेळगाव विधानसौध चलो’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन सादर करतेवेळी रघुनाथ शेंडगे, सुनील पाटील, राकेश चव्हाण, राजू कांबळे, प्रवीण कनवरे, रमेश भरमल, प्रकाश कामकर, मंजुनाथ हनगी आदींसह कर्नाटक राज्य विणकर सेवा संघ व राष्ट्रीय विणकर सेवा संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील विणकर बहुसंख्येने उपस्थित होते. उपरोक्त निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांसह शहर पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनाही देण्यात आली आहे.