बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रतिभावंत माजी विद्यार्थिनी वास्तुविशारद अक्षरा राजेंद्र मुंदडा यांना रोट्टरडॅम, नेदरलँड्स येथे आयोजित प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला आणि त्यांच्या वास्तुविशारदीय प्रबंधाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे.
बेळगावच्या अक्षरा मुंदडा यांच्या “एक्सपिरीयन्सिंग टाईम थ्रू आर्किटेक्चर” या प्रकल्पाची 2021 मधील आर्चीप्रिक्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये सादरीकरणासाठी निवड झाली होती. आता रोट्टरडॅम ,नेदरलँडमध्ये येत्या 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2023 या कालावधीत “युक्रेनची पुनर्बांधणी” (रिबिल्ड युक्रेन) विषयावर आयोजित प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी त्यांची निवड झाली आहे.
या कार्यशाळेदरम्यान अक्षरा यांना रोट्टरडॅम्स शहराच्या गुंतागुंतीच्या नियोजनाचा सखोल अभ्यास करून युक्रेनच्या पुनर्बांधणी संदर्भातील प्रस्ताव तयार करता येणार आहे.
आपल्या असामान्य पदवी प्रकल्पाद्वारे ओळखल्या जाणाऱ्या जगभरातील सुमारे 150 प्रतिभावंत व्यक्ती या कार्यशाळेच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.
वास्तुविशारद अक्षरा मुंदडा या बेळगावचे सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट राजेंद्र मुंदडा यांच्या कन्या असून रोट्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये त्या आपले कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचे उत्तम योगदान देतील यात शंका नाही.