बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून बी. अजित रेड्डी यांनी काल मंगळवारी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ के. आनंद यांच्या आत्महत्येनंतर सीईओ पद रिक्त झाले होते. त्या जागेवर कोणाची वर्णी लागणार? याची चर्चा कॅन्टोन्मेंट बोर्डात सुरू असताना बेंगलोर येथील अतिरिक्त डीईओ बी. अजित रेड्डी यांची हंगामी सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.
पदभार हाती घेणाऱ्या रेड्डी यांचे शिक्षण बी. टेक.पर्यंत झाले आहे ते 2012 च्या बॅचचे अधिकारी असून 14 डिसेंबर 2012 रोजी त्यांनी कामकाजाला सुरुवात केली होती. आतापर्यंत ते लांडोर उत्तराखंड या ठिकाणी तसेच सहाय्यक डीईओ आग्रा, सीईओ सिकंदराबाद म्हणून कार्य केले असून अलीकडे ते बेंगलोर येथे डीईओ म्हणून कार्यरत होते.
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ म्हणून बी. अजित रेड्डी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बोर्डाचे पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी त्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी देखील नव्या सीईओंचे स्वागत केले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत देखील बैठक घेतली.