बेळगाव लाईव्ह :शेतकऱ्यांचे प्रश्न, कृषी पत्तिन संस्थेवर गैरव्यवहाराचा आरोप करत मुतगा येथील युवा कार्यकर्ते सचिन पाटील यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेला आणि पाच दिवसांच्या उपोषणाला यश आले आहे.
सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकारी ए आर सुरेश गौडा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडूस्कर व ग्रामीणच्या आमदारांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता झाली. कोंडूस्कर आणि सहकार खात्याच्या अधिकारी यांनी शरबत देऊन सचिन यांचे उपोषण सोडवले. यावेळी शेतकरी नेते सिद्ध गौडा मोदगी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी युवा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील अष्टेकर यांनीही बाजू मांडली.
सरकारी अधिकाऱ्यांनी सहकारी पथ संस्थेत झालेल्या गैर प्रकारांची चौकशी सुरू केली आहे त्याच बरोबर शेतकऱ्यांचे थकीत पैसे ताबडतोब देण्याची सूचना करण्यात आली आहे. या शिवाय उपोषणाची प्रमुख मागणी असलेल्या ऑडिट करण्याचे आश्वासन मिळाले आहे.
सहकार खात्याकडून विशेष टीम बसवून आगामी एका महिन्यात गेल्या दहा वर्षांचे ऑडिट पूर्ण केले जाणार आहे.या मिळालेल्या ठोस आश्वासना मुळे गेले पाच दिवस अन्न त्याग करून उपोषणास बसलेले मुतगा येथील युवा कार्यकर्ते सचिन पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे.
मुतगा कृषी पत्तीन सहकारी संस्थेचे सेक्रेटरी दोन दिवसापासून नॉट रीचेबल झालेले आहेत त्यामुळे सहकार खाते जास्तच हरकतीत आले आहे.सचिन पाटील यांच्या या तगड्या भूमिकेची शेतकऱ्या कडून प्रशंसा होत आहे.
प्रामाणिक आंदोलनाचे फलित काय मिळते हे मुतगा येथे युवकाकडून झालेल्या उपोषणामुळे सिद्ध झाले आहे.