बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलकाच्या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू असून 153 अ दोषारोप पत्राची मूळ प्रत न्यायालयासमोर हजर न केल्यामुळे तसेच पोलीस अधिकारी नारायण बरमनी साक्षीसाठी सातत्याने गैरहजर असल्याने 167/15 खटल्यातून एकूण 26 जणांची बेळगावच्या द्वितीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश पंकजा कोन्नूर यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्यांमध्ये शांताराम राणू कुगजी, सतीश मनोहर कुगजी, राजू ओम्माण्णा धामणेकर, अशोक मारुती धामणेकर, विनोद जयवंत जाधव, रामा नारायण कुगजी, चंद्रकांत भीमाप्पा हंपण्णावर, शिवाप्पा निंगाप्पा हंपण्णावर, राहुल मारुती कुगजी, हेमंत लक्ष्मण नायकोजी, निलेश महादेव कुंडेकर, प्रकाश मल्हारी पाटील, उदय शंकर जाधव, चांगाप्पा गंगाराम कुगजी, श्रीधर जोतिबा जाधव, दिनेश मारुती घाडी, लक्ष्मण परशुराम कुगजी, योगेश पिराजी मजुकर, उमेश पांडुरंग जाधव, मंजुनाथ सोमय्या हिरेमठ, महेश भुजंग कुगजी, नागराज रेमानी कुगजी, प्रशांत कृष्णा टक्केकर, सुरेश रेमानी कुगजी, रामा भरमाण्णा पाटील आणि बबलू नारायण अष्टेकर यांचा समावेश आहे.
153 अ कलमान्वये दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना सरकारची परवानगी घ्यावी लागते. पोलिसांनी त्यानुसार सरकारची मंजुरी घेतली होती. मात्र त्याची मूळ प्रत न्यायालयासमोर हजर केली नव्हती. त्याचप्रमाणे वारंवार समन्स बजावून देखील पोलीस अधिकारी नारायण बरमनी न्यायालयासमोर साक्षीसाठी हजर न राहिल्यामुळे उपरोक्त सर्वांची केस नं. 167/15 सीसीमधून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
जिल्हा प्रशासनाने जुलै 2014 मध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्तात येळळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक हटवल्यानंतर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्या मराठी जनतेला पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर आंदोलन करणार्या 222 जणांवर गुन्हे दाखल करून खटले भरण्यात आले. त्यापैकी उपरोक्त खटल्याची यापूर्वी गेल्या मंगळवारी 10 ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती.
गेली 9 वर्षे ही केस चालू होती महाराष्ट्र राज्य फलकातील एकूण सात केस पैकी पहिली केस निर्दोष झाली आहेत. एकूण संशयित 222 होते त्यापैकी अद्याप 196 जण केस बाकी आहेत.
या सुनावणीला म. ए. समितीचे सर्व 26 संशयित उपस्थित होते. त्या सुनावणीत सर्व संशयितांचे जवाब नोंदवण्यात आले होते. त्यानंतर आज बुधवारी अंतिम सुनावणी होऊन न्यायाधीश पंकजा कोन्नूर यांनी 26 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्त झालेल्यांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर, आणि अॅड. शाम पाटील, अॅड महेश मोरे, शंकर बाळनाईक, विशाल चौगुले आदी वकिलांनी काम पाहिले. यावेळी वकील मारुती कामानाचे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलकाच्या दाव्यामध्ये 167 सीसी नंबर मध्ये आज आमची निर्दोष मुक्तता झाली आहे. आम्हा 122 जणांवर खटला सुरू होता. त्यापैकी 26 जण खटल्यातून मुक्त झाले आहेत. या पद्धतीने दाखल करण्यात आलेल्या अन्य गुन्ह्यातूनही आम्ही सर्वजण निर्दोष मुक्त होऊ असा आमचा विश्वास आहे. आमचे वकील ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर आणि ॲड. शाम पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमची बाजू न्यायालयासमोर मांडली आहे. अद्याप आमच्यावर 6 गुन्हे आहेत. त्या सर्वात आम्ही निर्दोष मुक्त होऊ असा मला विश्वास न्यायालयाच्या निकालानंतर एका कार्यकर्त्याने बेळगाव लाईव्हशी बोलताना व्यक्त केला.
https://x.com/belgaumlive/status/1714602485745369196?s=20