बेळगाव लाईव्ह :खासगी कार तसेच व्यावसायिक वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावली असेल तर सावधान. कारण, रहदारी पोलिसांनी यावर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे.
सूर्यप्रकाशाची प्रखरता टाळण्यासाठी तसेच वातानुकुलित यंत्रणा थंड राहण्यासाठी अनेकजण कारच्या काचांवर काळी फिल्म लावून घेतात. परंतु, रहदारी कायद्यानुसार या काचा किती काळ्या कराव्यात यासाठी नियम आहे.
कारच्या समोरील व मागील काच ३० टक्क्यांपर्यंत काळी करता येऊ शकते, तर बाजूच्या काचांवर ५० टक्क्यांपर्यंत फिल्म लावता येते. जेणेकरून बाहेरून पाहणाऱ्यांना आतील दिसू शकेल.
परंतु, अनेकजण कारच्या काचांवर एकदम गडद काळी फिल्म लावल्याने काहीच दिसून येत नाही. अशा कारवर कारवाईचा अधिकार रहदारी पोलिसांना आहे. अशा कार हेरुन शहरात गेल्या तीन दिवसांपासून दंडात्मक कारवाई सुरु आहे.
काचेवरील काळी फिल्म काढा व ५०० रुपये दंड आकारायचा अशी मोहीम रहदारी पोलिसांकडून सुरु आहे. गेल्या तीन दिवसांत वाहतूक व दक्षिण विभाग पोलिस ठाण्याकडून १९ वाहनांवर अशी कारवाई करून ९,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यापुढेही ती सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एकीकडे पोलिसांनी जनतेच्या गाड्यांच्या कार वरील काळ्या काचांवर कारवाई करत असताना दुसरीकडे अनेक शासकीय अधिकारी देखील आपल्या कार वर काळ्या काचेच्या ग्लास वापरतात त्यांच्यावर देखील कारवाई होईल का असा प्रश्न या निमित्ताने सोशल मीडियावर उपस्थित होत आहे.