बेळगाव लाईव्ह: 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव सह सीमाभागात काळा दिन पाळण्यात येतो त्यानिमित्ताने कडकडीत हरताळ असते त्याच दिवशी योगायोगाने कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर सर्वोच्य न्यायालयात सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी 1 रोजी ही महत्त्वाची सुनावणी होणार आहे. तब्बल वर्षभरानंतर ही सुनावणी होत आहे. यावेळी कर्नाटकच्या सीमाप्रश्न कालबाह्य असल्याच्या दाव्यावर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सीमाप्रश्नी गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी रेंगाळली आहे. या खटल्यात खंडपीठाची रचना त्रिसदस्यीय खंडपीठाची करण्यात आली आहे. पण, या खंडपीठात सातत्याने महाराष्ट्र किंवा कर्नाटकातील न्यायमूर्ती नियुक्त करण्यात येत होते. त्यामुळे, नैतिकतेच्या मुद्द्यावर या खटल्याची सुनावणी होऊ शकलेली नाही. यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करत होती. न्यायालयात तटस्थ न्यायमूर्ती नेमण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार अखेर बुधवारी ही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार १ नोव्हेंबर रोजी सीमाप्रश्नावर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती प्रशांतकुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. सीमाप्रश्नी या आधी २२ डिसेंबर रोजी सुनावणी होणार होती. पण, खंडपीठात कर्नाटकचे न्यायमूर्ती नियुक्त केल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. आता बुधवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तीन अर्जांवर सुनावणी शक्य
खंडपीठासमोर प्रामुख्याने तीन अंतरिम अर्जांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यात सीमाप्रश्नी कर्नाटकाने महाराष्ट्राचा दावा कालबाह्य झाला आहे, असा अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणी महत्त्वाची असेल. महाराष्ट्राच्या बाजूने ज्येष्ठ विधीज्ज्ञ हरिष साळवे सुनावणीला उपस्थित राहणार का, याचीही उत्सुकता आहे.