बेळगाव लाईव्ह:सांडपाणी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेत जमिनीची नुकसान भरपाई सरकारने संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ अदा करावी, या मागणीसाठी हालगा येथील संतप्त शेतकऱ्यांनी सांडपाणी प्रकल्पाचे काम बंद पाडून त्या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन छेडल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली.
हालगा -अलारवाड ब्रिज जवळ बेळगाव सांडपाणी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पासाठी 2013 साली सुपीक शेत जमीन संपादित करताना संबंधित जमीन मालक शेतकऱ्यांना एकरी 3 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र सदर नुकसान भरपाई आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
त्यामुळे सरकारने सदर नुकसान भरपाई तात्काळ अदा करावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी हालगा गावातील संतप्त शेतकऱ्यांनी प्रकल्पासमोर बेमुदत धरणे सत्याग्रह सुरू केला आहे. तत्पूर्वी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांडपाणी प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना बाहेर काढून प्रकल्पाचे काम बंद पाडले.
याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संतप्त शेतकऱ्यांना समजावून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तथापि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहणार असे शेतकऱ्यांनी पोलिसांना ठणकावले. शेतकरी नेते राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हालगा सांडपाणी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारा समोर छेडण्यात आलेल्या आंदोलनात बसवराज पाटील, भरतेश बेल्लद, महावीर बेल्लद, राजू मरकल, मारुती कानोजी, गुंडू बाळेकुंद्री, शंकर देवलतकर, मनोहर देवलतकर हेबाजी आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना हालगा गावातील युवा शेतकरी भरतेश बेल्लद म्हणाला की, शेतकऱ्यांचा विरोध असतानाही पोलीस बळाचा वापर करत 2019 मध्ये हालगा येथील 19 एकर 20 गुंठे सुपीक पिकाऊ शेत जमिनीमध्ये सांडपाणी प्रकल्प उभारण्यात आला आहे.
सदर प्रकल्पाच्या उभारणीपूर्वी जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना प्रति एकर 3 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. याउलट सुवर्ण विधानसौधसाठी जमीन संपादित करताना प्रति एकर 13.5 लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांना ते पैसे देण्यातही आले. मात्र 2013 मध्ये हालगा गावानजीकच्या सुपीक शेत जमिनीला मात्र अतिशय कमी म्हणजे प्रति एकर 3 लाख रुपये इतकी नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली. याची संबंधित अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. तसेच मंजूर झालेली ही नुकसान भरपाई त्वरित द्यावयास हवी होती. मात्र आजतागायत आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही.
असे सांगून त्यामुळे आम्ही हालगा येथील या सांडपाणी प्रकल्पाचे काम बंद पाडले आहे आणि जोपर्यंत आमचे म्हणणे सरकार ऐकून घेत नाही आम्हाला आमची नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत सदर प्रकल्पाचे काम आम्ही सुरू होऊ देणार नाही असे भरतेश बेल्लद याने स्पष्ट केले.