बेळगाव लाईव्ह :प्रशासनाकडून शहरातील अशोकनगर येथील फुलांच्या होलसेल मार्केट मधील शिल्लक टाकाऊ फुलांपासून अगरबत्ती तयार करण्याच्या केंद्राचे नुकतेच गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आले असले तरी ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही.
त्यामुळे टाकाऊ फुलांचा विनियोग न होता ढिगार्याच्या स्वरूपात साचून राहिलेली ही फुले कुजून फुल मार्केट व परिसराचे वातावरण प्रदूषित झाले आहे.
अलीकडेच काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अशोकनगर होलसेल फुल मार्केटमध्ये महापालिकेने स्थापलेल्या अगरबत्ती तयार करण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाला वृत्तपत्रांसह सोशल मीडियावर मोठी प्रसिद्धीही देण्यात आली. फुलांच्या मार्केटमधील शिल्लक फुलांचा चांगला विनियोग व्हावा या उद्देशाने सदर अगरबत्ती केंद्र स्थापनेत आले असले तरी उद्घाटन झाल्यानंतर ते कार्यरतच झालेले नाही. उद्घाटन झालेल्या दुसऱ्या दिवसापासून अगरबत्ती तयार करणाऱ्या सदर केंद्राचे मुख्यद्वार टाळे ठोकलेल्या अवस्थेत बंद आहे. सदर केंद्र बंद असले तरी होलसेल फुल मार्केटमधील व्यापारी शिल्लक राहिलेला आपल्याकडील फुलांचा साठा अगरबत्ती निर्मिती केंद्र समोर आणून टाकत आहेत.
त्यामुळे सध्या या केंद्रासमोर झेंडू, शेवंती, गुलाब वगैरे विविध शिल्लक टाकाऊ फुलांचे मोठे ढिगारे साचून राहिले आहेत. सध्याच्या पावसाळी वातावरणात अशोकनगर होलसेल फुलांच्या मार्केट आवारामध्ये फुलांचे हे ढीग कुजून परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. याचा फुल मार्केटमधील व्यापाऱ्यांसह आसपासच्या नागरिकांना त्रास होत आहे.
या संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना एक होलसेल फुल व्यापारी म्हणाला की, यंदा फुलांची आवक वाढली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेली आपली फुले नाईलाजाने होलसेल फुल मार्केटच्या आवारातच टाकावी लागत आहेत. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून या टाकाऊ फुलांच्या ढिगार्याची उचल करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा फुलांचा कचरा कुजून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधीमुळे त्रस्त झालेले आसपासचे रहिवासी आम्हाला येऊन जाब विचारत आहेत. अलीकडेच आमच्याकडील शिल्लक फुलांचा विनियोग करण्यासाठी महापालिकेने या ठिकाणी अगरबत्ती तयार करण्याचे केंद्र सुरू केले. मात्र सदर केंद्र उद्घाटनानंतर सुरूच झालेले नाही, असे त्या व्यापाऱ्याने सांगितले.
एकंदर सध्या अशोकनगर होलसेल फुलांच्या मार्केट मधील टाकाऊ फुलांची समस्या गंभीर बनली आहे. तेंव्हा सदर मार्केटमधील फुलांच्या कचऱ्याची उचल करण्याद्वारे ही समस्या तात्काळ दूर करण्याची जोरदार मागणी केली जात असून अगरबत्ती तयार करणारा कारखाना केव्हा सुरू होणार? असा सवाल फुलांच्या मार्केटमधील व्यापारी करत आहेत.