बेळगाव लाईव्ह :श्री दुर्गामाता दौडच्या पार्श्वभूमीवर अनगोळ येथील श्रीराम सेना हिंदुस्थानेने ‘गांधीगिरी’ करत आगळे आंदोलन छेडण्याद्वारे अनगोळच्या धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे गेली 5 वर्षे रखडलेले विकास काम तात्काळ पूर्ण करून या मूर्तीचे योग्य पद्धतीने अनावरण केले जावे या आपल्या मागणीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधले.
अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती गेल्या कांही महिन्यांपासून झाकलेल्या अवस्थेत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून सदर मूर्ती स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली होती. जी मध्यंतरी रखडली ती आता तब्बल 5 वर्षे उलटली तरी पूर्ण झालेली नाही. यंदाच्या निवडणुकीपूर्वी घाई गडबडीत बसवण्यात आलेल्या महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करून ती जनतेसाठी खुली करण्याऐवजी अद्याप झाकून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून हा महाराजांचा अवमान असल्याचे बोलले जात आहे.
तसेच स्थानिक नेत्याकडून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी, मते मिळवण्यासाठी महाराजांचा वापर केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. यासाठीच सदर मूर्ती व चौथऱ्याचे पुन्हा योग्य पद्धतीने अनावरण करून महाराजांची मूर्ती जनतेसाठी खुली करावी, या मागणीसाठी अनगोळच्या श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे अनगोळ भागातील आजच्या श्री दुर्गामाता दौडचे औचित्य साधून आगळे आंदोलन छेडण्यात आले.
दौडच्या मार्गावर असलेल्या धर्मवीर संभाजी चौकातील छ. संभाजी महाराज मूर्ती असलेल्या चौथर्यावर खाली मध्यभागी श्रीराम सेना हिंदुस्तानचे होर्डिंग लावण्याबरोबरच त्यांनी चौथर्यावर दोन्ही बाजूला शिवकालीन मावळ्यांच्या वेषातील लहान मुलांना हातात फलक घेऊन उभे केले होते.
मराठ्यांची मतं मिळवण्यासाठी केलं शंभूराजाच्या नावांचं राजकारण, दिलेला शब्द पाळायची सवय असेल तर लवकरात करा महाराजांच्या मूर्तीचे अनावरण. स्वर्गातून खाली पाहताना शिवरायांनाही वाटत असेल निवडणूक जिंकण्यासाठी इतिहासाचा वापर करणाऱ्यांना तीळ मात्रही लाज वाटली नसेल, शंभूराजांचा वापर करून वाढवली स्वतःची कीर्ती आपलं काम झाल्यावरती झाकून ठेवली मूर्ती, आबासाहेब.. आबासाहेब.. औरंगजेबाच्या अटकेतून केलीत आपली सुटका बेळगावकर स्वकीययांच्याच राजकारणात मी कशी करून घेऊ सुटका, स्वराज्यासाठी शंभूराजांनी आपले डोळे वाहिले म्हणून आज आपण हे उत्सव महोत्सव आणि सण पाहिले, देह रक्ताने माखला गनिमा पुढती ना झुकला बलिदान दिले राजाने म्हणून हिंदू धर्म हा टिकला, असा मजकूर असलेले फलक हातात धरून चौथर्यावर उभे असलेले छोटे मावळे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
अनगोळ येथील युवकांनी पाच वर्षापूर्वी म्हणजे 2018 च्या निवडणुकी वेळी आपल्या भागात धर्मवीर छ. संभाजी महाराजांची मूर्ती बसवण्याची मागणी केली होती. त्यावेळी बेळगाव दक्षिणच्या आमदारांनी ती मूर्ती बसवून देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार निवडणूक झाल्यानंतर कांही महिन्यातच त्यांनी महापालिकेकडून जागा वगैरे मंजूर करून घेतली. या तत्परतेमुळे अनगोळ भागातील युवा वर्ग खुश झाला. मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही, माशी कुठे जिंकली माहित नाही कारण पुढे अनगोळ ध. संभाजी चौकातील महाराजांची मूर्ती बसविण्यासाठी तब्बल 5 वर्षे विलंब झाला.
म्हणजे यावेळीची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना तीन-चार महिने अगोदर महाराजांची मूर्ती बसविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आणि निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास अवघे दोन दिवस असताना मूर्ती बसविण्याची गडबड सुरू झाली. मात्र महाराजांची मूर्ती देखील नीट तयार झालेली नसल्यामुळे अनगोळ मधील युवकांच्या एका गटाचे म्हणणे असे होते की, एवढी गडबड कशाला? कारण मूर्तीचे काम अजून पूर्ण व्हायचे आहे. तसेच मुर्ती जड असल्यामुळे ज्या चौथर्यावर बसविण्यात येणार आहे त्याचे बांधकाम देखील अद्याप कच्चे आहे.
तेंव्हा निवडणूक झाल्यानंतर मूर्ती बसविण्यात यावी अशी त्यांची मागणी होती मात्र आमदारांच्या समर्थकांचा मूर्ती तात्काळ बसवण्यास पाठिंबा असल्यामुळे युवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर धड पूर्णपणे तयार नसलेल्या महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढून ती अर्धवट बांधकाम झालेल्या चौथर्यावर बसवण्यात आली. या पद्धतीने घिसाड घाईने मूर्ती बसवण्यात आल्यानंतर लगेचच निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्व कामे ठप्प झाली. त्यानंतर निवडणूक पार पडली, सरकार अस्तित्वात आले आणि आता सर्व विकास कामे सुरळीत सुरू झाली असली तरी अनगोळ धर्मवीर संभाजी चौकातील छ. संभाजी महाराजांची मूर्ती आणि चौथऱ्याचे काम मात्र अर्धवट अवस्थेतच पडून आहे.
त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे. मूर्ती देखील अच्छादन घालून झाकून ठेवण्यात आली आहे. सदर प्रकाराबद्दल अनगोळ भागात तीव्र नाराजी व्यक्त होत असून महाराजांच्या मूर्ती आणि अर्धवट राहिलेल्या चौथऱ्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण तो लोकार्पण केला जावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.