बेळगाव लाईव्ह :राज्यातील 3000 लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये मद्य अर्थात दारू विक्रीसाठी नव्याने परवाने देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत आज सोमवारी विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रहासह तीव्र आंदोलन छेडून मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
राज्यात नव्याने मद्य विक्रीसाठी परवाने देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णया विरोधात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) आणि मद्य निषेध आंदोलन -कर्नाटक प्रगतीपर संघटनेगळ वक्कुट यांच्यातर्फे आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. यावेळी दारू विक्रीसाठी नव्याने परवाना देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. सदर आंदोलनात बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह छेडून बंद करा बंद करा दारू विक्री लायसन्स देणे बंद करा, दारूबंदी झालीच पाहिजे, आटली का बाटली कचकन फुटली अरे तुला लायसन्स देताना लाज का नाही वाटली यासारख्या दारू विरोधी घोषणा देणाऱ्या या महिला साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या.
यावेळी आंदोलनकर्त्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. राज्य सरकारने महसूल वाढीसाठी मद्य अर्थात दारू विक्रीचे नवे परवाने देण्याचा घेतलेला निर्णय साफ चुकीचा आहे. यातून समाजाला चुकीचा मार्ग दाखविल्यासारखे होणार आहे. तरुण वर्ग व्यसनाधीन बनणार आहे. दारूबंदीसाठी महात्मा गांधीजींनी देशभरात मोठी चळवळ उभारली होती. मात्र त्यानंतरच्या काळात देशात दारूबंदी झालीच नाही. राज्यातील विद्यमान सरकारकडून मध्य विक्री व्यवसायाला आणखी गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मद्यविक्रीतून मिळणारा पैसा लोककल्याणाकरिता वापरणे हा गुन्हा असल्याचे महात्मा गांधीजींनी म्हंटले होते.
महात्मा गांधीजींच्या या विचारांना राज्य सरकारने हरताळ फासू नये त्यासाठी बेकायदेशीर मध्ये विक्रीला पायबंध घालावा नव्याने 1000 मद्य विक्री दुकानांना परवाना दिला जाऊ नये. मॉल, सुपर मार्केट व ऑनलाईन मद्य विक्रीला परवाना देण्याचा घेतलेला निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा. महिलांचा सन्मान त्यांना स्वास्थ्यपूर्ण जीवन मिळवून देणे. यासारख्या गांधीजींच्या विचारांचा पुरस्कार सरकारने करावा अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मद्य निषेध आंदोलन -कर्नाटक प्रगतीपर संघटनेगळ वक्कुटच्या नेत्या कट्टणभावी येथील भारती यशवंत भांदुर्गे म्हणाल्या की, राज्यातील काँग्रेस सरकार वाईट विचार घेऊन येत आहे जे आम्हाला नको आहे. पूर्वी अवास्तव दारू दुकान बंद केली जायची. आता सरकारच जिथे 2000 हून अधिक लोकसंख्या आहे तिथं दारू दुकानासाठी परवानगी देत आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे. कारण ऐका दारूमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होऊन रस्त्यावर येतं. तेंव्हा सरकारने जो काही निर्णय घेतला आहे तो तात्काळ रद्द करावा, अन्यथा जोपर्यंत दारू विक्रीसाठी नव्याने परवाने देण्याचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत आमचा धरणे सत्याग्रह सुरूच राहील.
एसडीपीआयच्या एका नेत्याने महात्मा गांधीजींच्या विचारांना राज्य सरकारकडून हरताळ फासण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. तसेच 200 युनिट मोफत वीज, महिलांसाठी मोफत बस प्रवास, गृहिणींना मासिक 2 हजार रुपये मानधन या योजना सरकारने मद्य विक्रीची दुकाने वाढविण्यासाठीच सुरू केल्या आहेत का? असा सवाल जनतेने सरकारला विचारला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या जयंती दरम्यान मद्य विक्रीचे नवे परवाने देण्याचा सरकारचा निर्णय अतिशय लाजिरवाणा आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, असे त्याने सांगितले. याप्रसंगी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.