बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगर पालिकेच्या प्रशासन उपायुक्तपदी उदयकुमार तळवार यांची नियुक्ती झाली असून त्यांनी काल शुक्रवारी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.शनिवारी त्यांनी बेळगाव महापालिकेच्या बैठकीत देखील सहभाग घेतला.
याआधी हुबळी महापालिकेत विभाग आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या उदयकुमार तळवार यांनी पूर्वी बेळगाव महापालिकेत पर्यावरण अभियंता म्हणून सेवा बजावली आहे.
गेल्या 2014 ते 2018 या काळात महापालिकेमध्ये लोकनियुक्त सभागृह असताना त्यांनी महापालिकेच्या शहर स्वच्छता विभागाची जबाबदारी देखील सांभाळली होती. राज्यात सत्तांतर होताच त्यांनी बेळगाव महापालिकेत पुन्हा रुजू होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. तळवार यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून त्यांची बेळगाव महापालिका प्रशासन उपायुक्त म्हणून नेमणूक झाली आहे.
काल शुक्रवारी थेट बेंगलोर येथे जाऊन त्यांनी आपल्या नियुक्तीचा आदेश मिळवला. तसेच हुबळी महापालिका विभागायुक्त या पदावरून मुक्त होत लगेचच ते बेळगावला येऊन महापालिकेत रुजू झाले.
गेल्या दोन वर्षापासून भाग्यश्री हुग्गी या प्रशासन उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांची या पदावरून बदली झाली असून त्यांना अद्याप कोणत्याही पदावर नियुक्ती देण्यात आलेली नाही.