बेळगाव लाईव्ह:सरकारच्या महिलांसाठी मोफत प्रवासाच्या ‘शक्ती’ योजनेचा नवरात्रोत्सव काळात महिलावर्ग पुरेपूर लाभ उठवला असताना कर्नाटक राज्य वायव्य परिवहन मंडळाने देखील मागे न राहता नवरात्र काळात सौंदत्ती यल्लामा मार्गावर 84 लाख रुपयांच्या महसुलाची कमाई केली आहे.
कर्नाटक राज्य वायव्य परिवहन मंडळातर्फे नवरात्रोत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी बेळगाव, हुबळी व धारवाड येथून 500 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये बेळगाव येथून सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनासाठी असलेल्या अतिरिक्त 12 बसेसचा समावेश होता. नवरात्र आणि यल्लमा देवीच्या उत्सव काळात विशेष पिकप पॉईंट सुरू करून परिवहन मंडळाकडून प्रवाशांसाठी बेळगाव ते सौंदत्ती थेट विनाथांबा बस सेवा सुरू केली जाते.
त्यानुसार गेल्या 15 ऑक्टोबरपासून मध्यवर्ती बस स्थानकावर ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सेवेद्वारे सौंदत्ती मार्गावर गेल्या दहा दिवसात 84 लाख रुपयांचा महसूल बेळगाव परिवहन मंडळाला मिळाला आहे.
शक्ती योजनेअंतर्गत महिलांना राजभरात मोफत प्रवास असल्यामुळे यंदा सर्व धार्मिक स्थळे आणि इतर ठिकाणी महिलांची लक्षणीय गर्दी दिसून आली.
परिवहन मंडळाकडून महिलांना शून्य दराचे जरी तिकीट दिले जात असले तरी महिलांचा प्रवासाचा खर्च शासनाकडून अदा केला जातो. त्यानुसार नवरात्रोत्सव काळात बेळगाव विभागाला रोज सरासरी 5 लाख रुपयांचा जादा महसूल मिळाला आहे.