बेळगाव लाईव्ह:घरपट्टी वाढ करण्याच्या ठरावात फेरफार केला असून हा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव करावा, अशी मागणी करत सत्ताधारी भाजप आणि विरोधी गटात जोरदार चर्चा झाली. या प्रकरणात सत्ताधाऱ्यांनी आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याविरोधात आवाज उठवला तर विरोधी गटाने या प्रकरणात महापौर शोभा सोमनाचे यांचाही सहभाग असल्याचा आरोप केला. त्यामुळे सभागृहात जोरदार वादावादी पाहायला मिळाली. या सर्वात आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी अधिकाऱ्यांनी जो ठराव आपल्याकडे दिला, तोच आपण पुढे पाठवला, असे सांगून हात वर केले.
महापालिका सभागृहात शनिवारी (दि. 21) घरपट्टी वाढ केली नाही म्हणून नगरप्रशासन संचालयाने सभागृह का बरखास्त करू नये, अशी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीशीवरून जोरदार चर्चा झाली.
सभा सुरू होताच दक्षिण आमदारांनी महापालिका अधिकाऱ्यांनी महापालिका सभागृहात घरपट्टी वाढीबाबत जो ठराव झाला आहे, त्यामध्ये फेरफार करून चुकीच्या पद्धतीने ठराव सरकारला पाठवला असल्याचा आरोप केला. या प्रकरणी अधिकारी मनमानी करत आहेत. त्यामुळे सभागृहाच्या कामात हस्तक्षेप करून मनमानी ठराव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, चूक केलेल्या अधिकाऱ्यांची बढती रोखण्यात यावी, अशी मागणी केली.
यावर आमदार राजू सेट यांनी आक्षेप घेतला. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजेत. पण, घरपट्टी बाबत अधिकाऱ्यांनी सरकारला पाठविलेल्या चुकीच्या ठरावावर महापौर शोभा सोमनाचे यांनी का सही केली, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली.
आमदार सेठ यांच्या या मागणीनंतर सभागृहात जोरदार गोंधळ सुरू झाला. सत्ताधारी आक्रमक झाले. या प्रकरणात महापौर सोमणाचे यांचा काही सहभाग नाही, असे सांगितले. नगरसेवक शंकर पाटील यांनी चुकीच्या ठरावाबाबत आपल्याकडे पुरावे आहेत, असे सांगितले.