बेळगाव लाईव्ह :देशात भाषावार प्रांतरचना वेळी बेळगाव, कारवार निपाणी, बिदर, भालकीसह 865 गावांवर केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमा भागातील मराठी बांधवांतर्फे येत्या 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळून बेळगाव शहरात मुक सायकल फेरी काढण्यात येणार आहे. याबाबतची कल्पना पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांना देण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा प्रशासना कडून परवानगी देण्यास टाळाटाळ केली जात असली तरी कोणत्याही परिस्थितीत आम्ही मुक सायकल फेरी काढणारच असा निर्धार समिती नेत्यांनी केला आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धारामप्पा यांची भेट घेऊन काळा दिनाबाबत चर्चा केली. गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या पक्षपाती निर्णयाविरोधात काळा दिन पाळत आली आहे. या दिवशी सकाळी निषेध सायकल फेरी निघते आणि त्यानंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभा होते असे सांगून समिती नेत्यांनी काळ्या दिनाच्या फेरीचा हेतू आणि इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला.
तथापि पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी आडमुठी भूमिका घेत काळ्या दिनाच्या फेरीला परवानगी देणार नाही असे सांगून हा प्रश्न संपला आहे. तुम्ही फेरी काढू नका, असा अनाहूत सल्ला देण्याचा प्रयत्न केला मात्र दरवर्षीप्रमाणे काळ्या दिनाची सायकल फेरी यावेळीही निघणारच अशी स्पष्ट कल्पना पोलीस आयुक्तांना समिती नेत्यांनी दिली. या बैठकीस डी सी पी रोहन जगदीश, ए सी पी एन व्ही बरमनी, अरुणकुमार कोळळूर, गुन्हे शाखेचे ए सी पी बसवराज कट्टीमनी, खडे बाजार पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांची भेट घेणाऱ्या म. ए. समितीच्या शिष्टमंडळात सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांच्यासह माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, समिती नेते रमाकांत कोंडूस्कर, मध्यवर्ती नेते प्रकाश मरगाळे, जन संपर्क प्रमुख विकास कलगटगी, माजी नगरसेवक नेताजी जाधव आदींचा समावेश होता. दरम्यान येत्या बुधवारी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता धर्मवीर संभाजी उद्यानातून सायकल फेरीला प्रारंभ होणार आहे.
तरी शहर आणि परिसरातील मराठी भाषिकांनी प्रचंड संख्येने छ. संभाजी उद्यान येथे सायकल फेरीत सहभागी होण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे.