बेळगाव लाईव्ह :काळ्यादिनाला परवानगी देणार नाही, असे जिल्हाधिकारी आणि पोलिसानी सांगितले असले तरी, आम्हाला परवानगी मिळाली नाही तरी काळा दिन होणारच, असा निर्णय शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
काळ्यादिनाच्या आयोजनाबाबत बुधवारी रोजी मराठा मंदिरमध्ये समितीची महत्वाची बैठक झाली. अध्यक्षस्थानी सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर होते. या बैठकीत काळ्यादिनाला कोणी परवानगी दिली किंवा नाही तरी आम्ही काळा दिन पाळणार आहोत. पोलिसांनी गुन्हे दाखल केली तरी फेरी निघणारच आहे. फेरीच्या अगोदरच्या दिवशी कोणत्या ठिकाणी एकत्र जमायचे, याबाबत माहिती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
यावेळी शहर समितीकडून मध्यवर्ती समितीत नव्या लोकांचा समावेश करण्यात यावा. महाराष्ट्राकडे पाठपुरावा करण्यासाठी नव्या लोकांना संधी देण्यात यावी, युवा वर्गाकडे संघटनेत पदे देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीत माजी उपमहापौर संजय शिंदे, सागर पाटील, रणजीत हावळाणाचे, मदन बामणे, प्रशांत भातकांडे, रणजीत चव्हाण-पाटील, माजी नगरसेवक राजू बिर्जे, नेताजी जाधव, राकेश पलंगे, प्रशांत भातकांडे यांनी मनोगत व्यक्त करताना काळ्यादिनाची फेरी यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू, असे सांगितले.
दीपक दळवी यांनी सीमाप्रश्नासाठी प्रामाणिक काम केले आहे. त्यामुळे तेच अध्यक्षपदावर राहणार आहेत मात्र पुढील बैठक कार्यकारिणी करण्यासाठी घेऊ असे आश्वासन देण्यात आले.
प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, कपिल भोसले, शिवराज पाटील, बाबू कोले, चंद्रकांत कोंडुसकर, महादेव पाटील, रमेश माळवी, राजकुमार बोकडे, अनिल आमरोळे, शिवानी पाटील आदी उपस्थित होते.