बेळगाव लाईव्ह :सध्या बेळगाव महापालिकेत जो प्रकार घडत आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. महापौरांवर फिर्याद दाखल होणे ही शहरासाठी लांछनास्पद गोष्ट असून सदर प्रकारासंदर्भात येत्या दोन दिवसात माजी नगरसेवक संघटना बेळगावचे शिष्टमंडळ प्रादेशिक आयुक्तांची भेट घेणार आहे, अशी माहिती माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी दिली.
बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली मारुती मंदिर येथे आज दुपारी बेळगावच्या माजी महापौर आणि उपमहापौरांच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. माजी महापौर ॲड. सातेरी म्हणाले की, बेळगाव शहराचे माजी महापौर आणि उपमहापौरांची बैठक आज रविवारी सकाळी चव्हाट गल्ली मारुती मंदिर येथे पार पडली. सदर बैठकीत प्रामुख्याने 2020 मध्ये स्थापन झालेल्या माजी नगरसेवक संघटनेचे कोरोनाच्या संकट काळात थंडावलेले कार्य पुनर्जीवित करण्यासाठी आणि नागरिकांचे प्रश्न घेऊ शासन दरबारी नागरिकांच्या व्यथा मांडाव्यात. येत्या 19 नोव्हेंबर रोजी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करणे. या विषयांवर बैठकीत साधकबाधक चर्चा झाली. त्याचप्रमाणे तत्पूर्वी येत्या दोन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सध्या महानगरपालिकेत जो प्रकार सुरू आहे त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करून त्या संदर्भात काय करता येईल का? ते पाहिले जाणार आहे. तसेच महापालिकेत सध्या जो सत्ता संघर्ष पेटला आहे त्या संदर्भातही बैठकीत चर्चा झाली.
बेळगाव महानगरपालिकेत जो प्रकार सुरू आहे. त्याच्याशी आमदार खासदार अथवा पालकमंत्री यांचा संबंध येत नाही. आमच्या मते एकंदर सध्या बेळगाव महानगरपालिकेचा जनतेसमोर जो दर्जा आहे तो अत्यंत लाजिरवाणा झाला आहे. कारण नगरसेवकांना आपले अधिकार काय आहेत हे माहीत नाही. महापौरांना आपले अधिकार काय आहेत ते माहीत नाही. त्यामुळे अधिकारी वर्ग शिरजोर होत चालला आहे आणि कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्यावेळी निवडून आलेले प्रतिनिधी अस्तित्वहीन होतात त्यावेळेला अधिकाऱ्यांचं फावत आणि अधिकारी दिशाभूल करून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. आजचे महापालिकेत घडत आहे इतीवृत्ताची फाईल गायब होणे आणि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महापौरांवर फिर्याद दाखल होणे ही शहरासाठी देखील आम्हाला लांछनास्पद गोष्ट वाटते.
कारण आम्ही सगळी मंडळी त्या सभागृहामध्ये काम करून आलेलो आहोत आणि आम्ही सगळे आपला प्रभाव, आपल्या कामाची छाप त्या सभागृहामध्ये सोडून आलेले लोक आहोत. तेंव्हा आम्हाला असं वाटतं की यापुढे सुद्धा बेळगाव शहराच्या महानगरपालिकेची प्रतिष्ठा पूर्वीसारखी कायम राहावी. जेणेकरून नागरिकांचे प्रश्न सुटण्याला मदत होईल. तेंव्हा आज जे घडत आहे त्यासाठी दोष कुणाला द्यायचं हे ठरवणे कठीण आहे? कारण स्पष्टपणे काहीच समोर आलेलं नाही. काल महापौरांच्यावतीने पत्रकार परिषद झाली पण त्यामध्येही काहीच स्पष्ट न करता 138 सफाई कामगारांचा प्रश्न तेवढाच मांडण्यात आला. तेंव्हा महापालिकेत सध्या जे घडत आहे त्या संदर्भात प्रादेशिक आयुक्तांना भेटून महानगरपालिकेमध्ये जे काही चाललेल आहे त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालावं अशी या भागाचे प्रादेशिक आयुक्त म्हणून आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. त्यानंतर महापौर आणि आयुक्त यांना भेटायचे का नाही याचा विचार आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे येत्या 19 तारखेला दिवाळी झाल्यानंतर माजी नगरसेवक संघटनेची पुनर्रचना करून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही कार्य करण्याचे ठरवलेलं आहे, असे माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांनी स्पष्ट केले
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सध्या महापालिकेत सुरू असलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे असे सांगून महापालिकेचे कामकाज चालवताना महापालिका आयुक्त महापौर उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांमध्ये समन्वय असला पाहिजे हे आम्ही प्रादेशिक आयुक्तांच्या कानावर घालणार आहोत. कारण प्रादेशिक आयुक्तांना अधिकार आहेत की ते सदर प्रकरणात हस्तक्षेप करू शकतात अथवा आम्ही जे त्यांना सांगणार आहोत त्याचा अहवाल, आम्ही सादर केलेले निवेदन ते सरकारला धाडू शकतात. सध्या कोणी काहीच करावयास तयार नसल्यामुळे एवढ तरी होऊ शकतं. त्याचप्रमाणे महापालिकेच्या कारभारामध्ये बाहेरची मंडळी ढवळाढवळ करत आहेत हे देखील योग्य नाही थोडक्यात बेळगाव महानगरपालिका व्यवस्थित चालावी. महिला महापौराचा अवमान केला जाऊ नये, याचा विचार जसा आम्ही करतो तसा त्यानी स्वतः देखील केला पाहिजे. चांगल्या जाणकार लोकांचा सल्ला घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि दक्षिण आमदार यांच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी महापौर रमेश कुडची म्हणाले की. मी देखील त्या सभागृहामध्ये महापौर आणि आमदार म्हणून खूप काम केलेले आहे. मात्र नगरसेवकांच्या अधिकारांमध्ये मी कधीही गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप केलेला नाही. कोणत्याही प्रभागात मी स्थानिक नगरसेवकाला सोबत घेतल्याशिवाय गेलेलो नाही. इतका माझा सर्व नगरसेवकांशी स्नेहभाव आणि विश्वास होता. आता परिस्थिती वेगळी आहे तो भाग वेगळा. मात्र सध्या महापालिकेमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती लक्षात घेता आमदार वगैरेंनी महापालिकेच्या कारभारात किती हस्तक्षेप करायचा हे त्यांचं त्यांना लक्षात यावयास हवे. आम्ही इतक्या जणांनी महापौर किंवा उपमहापौर म्हणून कार्य केले आहे. महापालिकेमध्ये तेथील सभागृहात महापौर हे सर्वोच्च असतात. त्यांच्या परवानगी खेरीस कोणालाही सभागृहात पाऊल ठेवता येत नाही.
मात्र नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी कोणीही सभागृहात येत होते जात होते. याला सभागृह म्हणतात काय? आम्ही महापालिकेत निवडून जातो ते जनतेचे काम करण्यासाठी राजकारण करण्यासाठी नव्हे. प्रत्येकाने सभागृहाचा सन्मान राखलाच पाहिजे. त्या ठिकाणच्या मर्यादेचे उल्लंघन करता कामा नये आणि याचा विचार केला गेला पाहिजे. मात्र दुर्दैवाने सध्याचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याकडून महापालिका सभागृहाचा सन्मान राखला जात नाही आहे, असे माजी महापौर कुडची यांनी खेदाने सांगितले पत्रकार परिषदेस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, सरिता पाटील, वंदना बेळगुंदकर, आप्पासाहेब पुजारी, उपमहापौर शिवाजी सुंठकर, दीपक वाघेला, लतीफ खान पठाण, रेणू किल्लेकर आदी बेळगावचे सर्व माजी महापौर व उपमहापौर उपस्थित होते.