बेळगाव लाईव्ह :जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी यंदाचा हंगाम 1 नोव्हेंबरनंतर सुरू करावा. एफआरपी कारखान्याच्या सूचना फलकावर लावावा. काटामारी करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित बैठकीत विविध सूचना केल्या.
ऊस उत्पादकांच्या मागण्या कायदेशीर कक्षेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रामाणिक प्रयत्न करेल. साखर कारखान्यांच्या एफआरपीची माहिती शेतकर्यांना देण्यात येईल. शेतकर्यांनी वजनामध्ये त्रुटी किंवा तफावतीची तक्रार केल्यास सर्वांच्या उपस्थितीत कायदेशीर कारवाई केली जाईल.
शेतकरी स्वत: सरकारी अनुदान मिळवून वजनमाप यंत्र (वेब्रिज) उभारू शकतात. याचाही विचार शेतकरी प्रतिनिधी करू शकतात, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.
बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी दिलेल्या सर्व सूचनांच्या आधारे योग्य ती कार्यवाही केली जाईल. यापूर्वीच सुरू झालेल्या अळगवाडी कारखान्याची पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी, कारखाना सुरू करताना प्रत्येक कारखान्यातील वजन काटे तपासणे बंधनकारक आहे. तसे न करणार्यांवर कारवाई करू, असा इशारा दिला.
निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. खंडगावी यांनी साखरेचे उत्पन्न, तोडणी प्रक्रिया आणि इतर समस्यांबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. अधिकारी शुभम शुक्ला, अन्न, नागरी पुरवठा खत्याचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील आदी उपस्थित होते.
साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांनाही बैठकीला बोलावून चर्चा होईल, तेव्हाच हा प्रश्न सुटणार आहे. प्रशासनाने स्वत:चे वजनकाटे बसवावेत. तिथे जे वजन होईल, तेवढे वजन कारखान्याच्या काट्यावर न झाल्यास कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी प्रतिनिधींनी केली.