बेळगाव लाईव्ह :खानापूर ॲथलेटिक्स डेव्हलपमेंट असोसिएशन तर्फे आज रविवारी सकाळी आयोजित 3 ऱ्या पर्वातील खानापूर हाफ मॅरेथॉन शर्यतीमध्ये केनियाच्या आंतरराष्ट्रीय धावपटूंना मागे टाकत पुरुष गटामध्ये इलाईट रनिंग अकॅडमी खानापूरचा अनंत गांवकर आणि महिला गटात रोहिणी पाटील यांनी शर्यतीचे अजिंक्यपद पटकाविले. त्याचप्रमाणे 10 कि.मी. खुल्या विभागातील मॅरेथॉनचे जेतेपद विवेक मोरे आणि आकांक्षा गणेबैलकर यांनी मिळविले.
लाईट रनिंग अकॅडमी खानापूर हे प्रमुख पुरस्कर्ते आणि खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर व रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव हे सहप्रायोजक असलेली 3 ऱ्या पर्वातील खानापूर हाफ मॅरेथॉन आज रविवारी सकाळी खानापूर -जांबोटी रस्त्यावर यशस्वीरित्या पार पडली.
सदर भव्य शर्यतीमध्ये बेळगाव -खानापूरसह देशाच्या कानाकोपऱ्यातील 7 ते 71 वर्षे वयोगटातील सुमारे 800 धावपटूंनी भाग घेतला होता. यामध्ये केनियाच्या आंतरराष्ट्रीय धावपटूंचाही समावेश होता. मुख्य हाफ मॅरेथॉन 21.097 कि.मी. अंतराची होती. याबरोबरच 10 कि.मी., 5 कि.मी. आणि 3 कि.मी. अंतराच्या शर्यती घेण्यात आल्या.
मुख्य शर्यतीसह इतर शर्यतींमधील विजेत्यांना एकूण 2.50 लाख रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली. विविध वयोगटात घेण्यात आलेल्या या शर्यतीचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे.
34 वर्षापर्यंतचा गट (पुरुष) -1) अनंत बी. गांवकर (01:15:31.76), 2) इमान ईदलान, 3) मोहम्मद झिक्र. 34 वर्षापर्यंतचा गट (महिला) -1) रोहिणी लक्ष्मण पाटील, 2) जस्मिता कोडनकिरी, 3) भक्ती सुनील पोटे. 35 वर्षावरील गट (महिला) -1)सुसान चिबट. 35 ते 44 वर्षे गट (पुरुष) -1) रिचर्डकीप्रोप चिलगट, 2) मल्लाप्पा मल्लाप्पा, 3) विनायक जांबोटकर. 45 वर्षावरील गट (पुरुष) -1) शिवलिंगप्पा एस. गुट्टगी, 2) दीपक खटावकर, 3) अमन नदाफ.
सदर शर्यतीच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ हा प्रमुख पाहुणे म्हणून लैला शुगर्स खानापूरचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील, सीजीएसटीचे आयआरएस अतिरिक्त आयुक्त अमितकुमार शर्मा, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे माजी अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, शिवराज डेंटल क्लिनिकचे डॉ. राधाकृष्ण हरवाडेकर आणि नागाण्णा होसमणी उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी शर्यतींमध्ये सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना पदके देण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांना शर्यतीसाठी दर्जेदार टी-शर्ट, टाइमिंग सर्टिफिकेट, शर्यतीचे फोटो, हायड्रेशन सपोर्ट आणि वैद्यकीय सहाय्य देखील उपलब्ध करून देण्यात आले होते. खानापूर हाफ मॅरेथॉन शर्यत यशस्वी करण्यासाठी खानापूर ॲथलेटिक्स डेव्हलपमेंट असोसिएशनच्या आयोजक समितीमधील खानापूरचे क्रीडाप्रेमी व्यावसायिक अरुण होसमणी, मराठा मंडळ डिग्री कॉलेज खानापूरचे क्रीडा संचालक कपिल गुरव, इलाईट रनिंग अकॅडमी खानापूरचे संस्थापक संचालक जगदीश शिंदे, गुरुप्रसाद देसाई, सुरज बिरसे, आकाश गुरव, प्रथमेश गुरव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शर्यतीच्या सहयोगी प्रायोजकांमध्ये नागाण्णा होसमणी कन्वेंशन हॉल, शिवराज डेंटल क्लिनिक, पीएम ट्रान्सपोर्ट बेळगाव, महेश कदम व कुटुंबीय, ओम साई क्लिनिक, लक्ष्मी कम्युनिकेशन खानापूर, राजा टाईल्स आणि ओम साई क्लिनिक यांचा समावेश होता. शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी बहुसंख्य क्रीडाप्रेमी उपस्थित होते.