बेळगाव लाईव्ह :येत्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कन्नड सक्तीचा बडगा उगारताना महापालिकेकडून व्यापारी आस्थापनांच्या फलकावरील 60 टक्के मजकूर कन्नड भाषेतच हवा, अशी नोटीस शहरातील व्यापारी आस्थापनांना बजावण्यात आली आहे.
व्यापारी आस्थापनांच्या फलकांवरील 60 टक्के भागातील मजकूर हा कन्नड भाषेत असावा तर उर्वरित 40 टक्के भागात अन्य कोणत्याही भाषेचा वापर केला जावा अशी सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीसीद्वारे केली आहे.
बेळगाव शहरात कानडीकरण करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून सातत्याने केला जातो. बेळगाव महापालिकेकडून देखील हा प्रयत्न गेल्या कांही वर्षांपासून सातत्याने केला जात आहे. आता 1 नोव्हेंबर रोजीच्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कन्नड सक्तीची कार्यवाही सुरू केली आहे.
त्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याआधी महिनाभरापूर्वी महापालिका आयुक्त अशोक दूडगुंडी यांनी याबाबतचे एक पत्रक प्रसिद्ध दिले होते. त्यातही 60 टक्के मजकूर कन्नड भाषेत लिहिण्याची सक्ती केली होती. तथापि आयुक्तांच्या या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
बेळगाव शहरात महाराष्ट्र व गोव्यातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यांना कन्नड भाषा येत नसल्यामुळे बहुतेक आस्थापनांवर मराठी, कन्नड व इंग्रजी असे तीन भाषेतील फलक लावण्यात आल्याचे पहावयास मिळते.
मात्र त्या फलकावरील कन्नड मजकूर 60 टक्के ठेवून कन्नडला अधिक प्राधान्य दिले जावे, असे महापालिकेचे मत आहे.