बेळगाव लाईव्ह : दुपारच्या सत्रात महापालिका बैठकीत दाखल झालेले पालक मंत्री सतीश जारकिहोळी यांनी बैठक सुरू होण्यासाठी तब्बल अर्धा तास वाट बघावी लागली होती त्याकाळात पालकमंत्री सभागृहात तळ ठोकून होते दुसरीकडे बैठक संपल्यावर रात्री साडे सात पर्यंत ते मनपात बसून होते.
महापालिकेच्या कौन्सिल विभागातून महापौरांची सही असलेली घरपट्टी वाढीच्या ठरावाची फाईल चोरीस गेली आहे. त्यामुळे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेनुसार आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी प्रभारी कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेत शनिवारी घरपट्टी वाढीच्या फाईलवरुन जोरदार वादावादी झाली. त्यामुळे 16 सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील ठरावाची मूळ फाईल कौन्सिल विभागातून चोरीस गेली आहे. त्या फाईलमधील ठराव नगरप्रशासन संचनालयाला पाठवण्यात आला होता. त्यावर महापौर शोभा सोमनाचे यांची सही होती, असा दावा विरोधी गटाने केला आहे. तर सत्ताधारी गटाने महापौरांची बनावट सही करण्यात आली आहे, असा दावा केला आहे.
पण, मूळ फाईल चोरीस गेली असल्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांत तक्रार करण्याच्या सूचना पालकमंत्री जारकीहोळी आणि आमदार राजू सेठ यांनी केल्या होत्या. त्यानुसार आयुक्त दुडगुंटी कौन्सिल सेक्रेटरी बेटगेरी यांच्याविरोधात मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार करणार आहेत.
खुद्द पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्या ठरावावरील महापौरांची सही बनाव असल्याचा दावा करणाऱ्यांच्या घरात ठरावाची मूळ फाईल असू शकते असा अंदाज व्यक्त केला होता त्या अनुषंगाने पोलिसात तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगितले होते त्यानुसार आयुक्तांना पोलिसात तक्रार करण्याचे सांगितले होते.
फाईल चोरीबाबत पालकमंत्री रात्री साडेतास वाजेपर्यंत महापालिकेत थांबून होते. त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण अजून चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पालकमंत्री पालकमंत्री मनपातील सत्ताधारी गट आणि स्थानिक आमदार मनपाचा विरोधी गट आणि बेळगाव महापालिकेचे अधिकारी या सर्वात रंगणारी ही राजकीय तुंबळ कुठपर्यंत रंगणार आणि बेळगाव महापालिकेचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.