बेळगाव लाईव्ह :तृतीयपंथीय (किन्नर) लोकांमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्याकरिता सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने कर्म भूमी फाउंडेशनतर्फे (केबीएफ) येत्या रविवार दि. 29 ऑक्टोबर रोजी ‘विल ऑफ गॉड 2के23’ हा बेळगावातील तृतीय पंथीयांसाठी असलेला हा राज्यातील पहिला ‘फॅशन शो’ आयोजित करण्यात आला असून त्यासाठी तृतीयपंथीय मॉडल्सची तयारी करून घेतली जात आहे.
यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना कर्म भूमी फाउंडेशनच्या संस्थापक व संचालिका डॉ. श्वेता डी. पाटील म्हणाल्या की, सदर फॅशन शोच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यापासून प्रशिक्षण देण्याद्वारे किन्नर अर्थात तृतीयपंथीयांकडून तयारी करून घेतली जात आहे.
हे प्रशिक्षण फॅशन शोच्या आधी रॅम्प वॉकची तयारी करण्याच्या दृष्टीने मॉडेल्सना उपयोगी पडणार आहे. विल ऑफ गॉड 2के23 या फॅशन शोमध्ये जवळपास 20 तृतीयपंथीय भाग घेणारा असून त्या व्यतिरिक्त 10 पुरुष आणि 10 स्त्री मॉडेल्सचा या फॅशन शोमध्ये सहभाग असणार आहे.
याव्यतिरिक सदर फॅशन शो दरम्यान अंधशाळेचे विद्यार्थी सुश्राव्य गाणी सादर करून तर एचआयव्ही पॉझिटिव्ह मुले नृत्याद्वारे आपली प्रतिभा सादर करतील. फॅशन शोचे औचित्य साधून सामाजिक कार्याच्या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या निवडक पाच व्यक्तींचा सत्कार देखील केला जाणार आहे.
कुमार गंधर्व रंगमंदिर येथे आयोजित विल ऑफ गॉड 2के23 या फॅशन शोचे उद्घाटन दि. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते केले जाईल.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हब्बाळकर उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय अतिथी म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ, धारवाड ग्रामीणचे आमदार विनय कुलकर्णी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदी उपस्थित राहणार आहेत असे सांगून सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्या वामसी कृष्णा, बेळगावचे नामांकित फॅशन डिझायनर नवनीत पाटील, फॅशन मॉडेल सुविना गौडा आणि प्रसिद्ध कलाकार प्रीती पावटे हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. फॅशन शोला 25 हून अधिक एनजीओ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. श्वेता पाटील यांनी दिली.