बेळगाव लाईव्ह :माणुसकी हरवलेल्या एका व्यक्तीमुळे ठळकवाडी हायस्कूलचा विद्यार्थी आणि रघुनाथ पेठ अनगोळ येथील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलाचा विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी भाग्यनगर 10 क्रॉस येथील गोमटेश विद्यापीठा समोर घडली.
मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नांव रजित गौरब (वय 14) असे आहे. ज्यावेळी त्याला विजेचा धक्का बसला त्यावेळी त्याचा जीव वाचविण्या ऐवजी तेथील घरमालकाने बघ्याची भूमिका घेत माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार केला असा आरोप केला जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रजित हा पेपर टाकण्याकरिता आज भाग्यनगर येथे गेला होता. यावेळी येथील एका घर मालकाने आज अमावस्या असल्याकारणाने तुला 200 रुपये देतो माझी कार धुऊन दे असे सांगितले आणि त्याला आपल्या घरातील कार वॉशिंगची मशीन दिली. मात्र मशीन सुरू करताच त्यात बिघाड निर्माण होऊन शॉर्टसर्किट होण्याद्वारे रजित याला विजेचा तीव्र धक्का बसला व तो खाली कोसळला. खाली पाणी साचले असल्याने त्याच्या अंगामध्ये विद्युत प्रवाह संचारून तो बेशुद्ध झाला.
तेंव्हा संबंधित घर मालकाने त्याला दवाखान्यात दाखल करण्याऐवजी गेटच्या बाहेर उचलून ठेवले आणि हात हातावर ठेवून फक्त पहात राहिला. सदर घटना रजितच्या वडिलांच्या मित्रांना कळताच त्यांनी लागलीच त्यांच्या आई-वडिलांना घटनास्थळी बोलावून रुग्णवाहिकेमधून दवाखान्यात पाठवले. तथापि दवाखान्यात उपचार सुरू असताना रजीतचा मृत्यू झाला.
यावेळी डॉक्टरांनी त्याला अर्धा तास आधी दाखल केले असते तर तो बचावला असता असे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन रजीतचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता सिव्हिल हॉस्पिटलला पाठवला. तसेच चौकशीसाठी संबंधित घर मालकाला पोलीस स्थानकात बोलावून घेतले.
दरम्यान त्या घरमालकाने विजेचा धक्का बसलेल्या रजीतकडे दुर्लक्ष करून माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच पोलीस स्थानकासमोर संतप्त नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
टिळकवाडी पोलीस स्थानकासमोर रंजीतच्या आईने देखील हंबरडा फोडला. तसेच प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, माझा एकुलता एक 14 वर्षांचा मुलगा होता. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने सकाळी उठून तो घरोघरी पेपर टाकायचा आणि त्यानंतर शाळेला जायचा. तो ठळकवाडी हायस्कूलमध्ये आठव्या इयत्तेत शिकत होता. आता दसऱ्याची सुट्टी असल्याने चार पैसे जादा मिळतील आणि आपला दसरा चांगला होईल हा विचार करून त्याने गाडी धुण्यास होकार दिला. मात्र तो त्याचा शेवटचा क्षण ठरला असे रजीतच्या आईने सांगितले.
तसेच जर कारमालकाने त्याला वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल केले असते तर आज माझा मुलगा माझ्यासोबत राहिला असता. त्या व्यक्तीने जराही माणुसकी दाखवली नाही. माझ्या मुलाला त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी गेटच्या बाहेर आणून टाकले ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यासाठी आम्ही तक्रार दाखल करण्याकरिता टिळकवाडी पोलिस स्थानकात आलो आहोत.
माझ्या पोटचा गोळा गेला असे सांगून तिने हंबरडा फोडला. रजीतच्या मृत्यूच्या घटनेची टिळकवाडी पोलीस स्थानकात नोंद झाली असून असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अल्पवयीन रजित गौरब याच्या दुर्दैवी मृत्यू बद्दल रघुनाथ पेठ अनगोळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे