बेळगाव लाईव्ह :बेकीनकेरी ग्रा. पं. व्याप्तीतील अतिवाड (ता. जि. बेळगाव) येथे पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या धरण वजा तलावासाठी आपल्या शेत जमिनी दिलेल्या आम्हा शेतकऱ्यांना गेल्या 15 वर्षातील पीक पाण्याच्या नुकसानीची भरपाई अथवा पर्यायी जमीन तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेने बेळगावतर्फे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
रयत संघाचे ज्येष्ठ नेते प्रकाश रामा नायक यांच्या नेतृत्वाखाली अतिवाड येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज मंगळवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले.
निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी शेतकऱ्यांची मागणी सरकार दरबारी पोहोचवण्याचे आश्वासन दिले. आपल्या मागणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते प्रकाश नायक म्हणाले की, राजकारणी मंडळी आणि सरकार शेतकऱ्यांशी कसे वाईट वागते त्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे हे अतिवाडचे शेतकरी आहेत. गेल्या 15 वर्षांपूर्वी या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पासाठी देऊ केल्या.
या पद्धतीने माणुसकी दाखवणाऱ्या या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र दुःख -वेदना आल्या आहेत. शेत जमिनीच्या मोबदल्यात सरकारने 15 वर्षे उलटून गेली तरी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही किंवा पर्यायी सोयीही केलेली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हा शेतकऱ्यांच्या जीवावर आजवर निवडून गेलेल्या आमदार, खासदार व मंत्र्यांनी आमचा विश्वासघात करून आम्हाला दगाच दिला आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
सध्या आमची मागणी आहे की, अतिवाडच्या संबंधित शेतकऱ्यांना गेल्या 15 वर्षातील पीक पाण्याच्या नुकसानीची भरपाई तात्काळ दिली जावी. त्याचप्रमाणे कायद्यानुसार आम्हाला जी थेट नुकसान भरपाई मिळायला हवी होती ती भरपाई आम्हाला सध्याच्या बाजारभावानुसार मिळाली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे जी काही नुकसान भरपाई मंजूर होते, ती मध्यस्थांकरवी न मिळता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जावी असे सांगून या आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास कर्नाटक राज्य रयत संघ अधिकाऱ्यांसह संबंधित सर्वांना चांगला धडा शिकवेल असा इशारा प्रकाश नायक यांनी दिला.
अतिवाडचे शेतकरी सातेरी वैजू पाटील म्हणाले की, अतिवाड गावाच्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये लघु पाटबंधारे खात्यातर्फे धरण बांधण्यात आले आहे. मात्र आम्हा शेतकऱ्यांना पर्यायी जमीनही देण्यात आलेली नाही अथवा नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेत जमीन नसल्यामुळे आमच्यावर सध्याच्या महागाईच्या दिवसात उपासमारीची पाळी आली आहे.
नुकसान भरपाई किंवा पर्यायी जमीन मिळावे यासाठी आम्ही वारंवार मागणी करून, निवेदने सादर करून देखील अद्याप त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. फक्त आश्वासने देण्यापलीकडे अधिकारी काहीही करत नाहीत. या सर्व प्रकारांना आम्ही कंटाळलो असून आमच्यावर जीव देण्याची वेळ आली आहे.
गेल्या 15 वर्षापासून आम्हाला एक रुपया देखील नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही किंवा पर्यायी जमीन नाही. नुकसान भरपाई नाही तर मग आम्ही जगायचे कसे? तेंव्हा सरकारने याचा गांभीर्याने विचार करून आम्हा शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई तरी द्यावी किंवा पर्यायी शेत जमीन तरी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सातेरी पाटील यांनी केली. याप्रसंगी अतिवाड येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते