बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह विशेष :नवरात्रोत्सवाला काल रविवारपासून प्रारंभ झाला असून या निमित्ताने बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून आम्ही बेळगाव शहरातील विविध देवतांच्या मंदिरांची माहिती देत आहोत
ओल्ड पी बी रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाखालील तानाजी गल्लीच्या कॉर्नरला बेळगाव मधील पुरातन असे श्री रेणुका देवी मंदिर आहे. नवरात्र उत्सवानिमित्त सध्या या मंदिराची विद्युत रोषणाईने आकर्षक सजावट करण्यात आली असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.
इसवी सन 1514 मध्ये रायबागच्या भोमाप्पा नाईक यांनी राष्ट्रकूट आणि चालुक्यांच्या मदतीने सिद्धचल पर्वतावर श्री रेणुका मातेचे मंदिर स्थापन केले आणि त्यानंतर असंख्य भक्तांची सिद्धचल पर्वताकडे जाण्यासाठी रीघ लागली. त्याकाळी अनेक कारणास्तव भाविक श्री रेणुका देवीच्या दर्शनाला जात होते. तथापी सिद्धचल पर्वताकडे जाण्याचा मार्ग खडतर होता. आजच्यासारखे रस्ते अथवा दळणवळणाची साधने त्यावेळी नव्हती. देवीच्या दर्शनासाठी जाताना मार्गात ठिकठिकाणी येणारा धोकादायक जंगलय प्रदेश भक्तांना ओलांडावा लागायचा. प्रवासात असंख्य अडचणी यायच्या. बऱ्याच जणांना वय परत्वे अथवा आजारपणामुळे सिद्धचल पर्वतावरील श्री रेणुका देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचणे अशक्य व्हायचे. त्यांच्या सोयीसाठी कालांतराने विविध ठिकाणी श्री रेणुका मातेची मंदिर उभारण्यात आली. त्यापैकीच एक असलेल्या तानाजी गल्ली कॉर्नर वरील श्री रेणुका देवी मंदिराच्या बाबतीत पुढील प्रमाणे एक आख्यायिका सांगितली जाते.
जुन्या काळी एका गावचे कांही भाविक बैलगाडीमध्ये आवश्यक सामान भरून श्री रेणुका देवीच्या दर्शनाला निघाले होते. त्यावेळी त्या भाविकांसोबत असलेल्या एका महिलेला प्रवासामुळे अतिशय थकवा आला आणि ती या ठिकाणच्या एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसली. बसल्या जागीच तिने ‘देवी यापुढील प्रवास माझ्याकडून होणे अशक्य आहे. तेंव्हा तू काहीतरी कर’ अशी प्रार्थना तिने श्री रेणुका मातेला केली. तेंव्हा देवीने तिला दर्शन देऊन ‘मी तुझ्यासाठी इथवर आली आहे’ असे त्या महिलेला सांगितले. तेंव्हापासून वड, पिंपळ व औदुंबर अशा तीन झाडांचा संगम असलेल्या या झाडाखाली रेणुका देवीचा कायम वास असतो असे भाविकांचे म्हणणे आहे.
संबंधित महिलेला देवीने दर्शन दिल्यानंतर बेळगावचे भाविक या झाडाच्या ठिकाणी येऊन देवीची पूजा -आराधना करू लागले आणि हळूहळू या ठिकाणी श्री रेणुका मातेचे स्थान निर्माण झाले. कालांतराने श्री रेणुका देवी मंदिराची उभारणी देखील करण्यात आली आज या ठिकाणी नवचंडी यज्ञासह होम हवन तसेच इतर धार्मिक विधी केले जातात. देवीची विधिवत पूजा तर नित्यनियमाने केली जाते. सध्या नवरात्रीनिमित्त नवचंडी होमासह इतर विशेष धार्मिक विधींना या मंदिरात सुरुवात झाली असून देवीच्या दर्शनासाठी असंख्यभक्त या मंदिराला भेट देत आहेत.
गेल्या सहा वर्षापासून राहुल मुचंडी आणि त्यांची टीम अर्थात सहकारी या मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहेत. कांही वर्षांपूर्वी या मंदिराच्या ठिकाणी औदुंबर, वड व पिंपळ एकत्र असलेल्या झाडाखाली एक छोटस मंदिर होतं. मात्र गेल्या 5 वर्षात या मंदिराचा कायापालट झाला आहे. जुन्या छोट्या मंदिराच्या स्वरूपातील रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. तानाजी गल्लीतील या मंदिराचा मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार करण्यात आला आहे. याचे संपूर्ण श्रेय तानाजी गल्ली, समर्थनगर भागातील श्री रेणुका देवीच्या भक्तांना जाते. सध्या नवरात्रीनिमित्त सदर मंदिर विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळाने आकर्षक रित्या सजवण्यात आले आहे. जे भाविक सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिराला जाऊ शकत नाहीत त्यांनी तानाजी गल्लीतील या श्री रेणुका मातेच्या मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेण्यास कांहीच हरकत नाही.
या मंदिराच्या ठिकाणी सध्या असलेल्या झाडाखाली जुन्या काळी ज्या महिला भाविकेने देवीची आराधना केली असे म्हंटले जाते, ते झाड प्रचंड मोठे झाले आहे. ज्यामुळे या झाडाचे पौराणिक महत्त्व आज देखील आपल्याला जाणवते. त्याचबरोबर या ठिकाणी पूर्वी जे भक्त येत होते त्यांच्या श्रद्धेने जसजसा मंदिराचा विकास होत गेला त्या विकासाच्या संकल्पने मागे या भागातील नागरिक आणि भक्तगण यांचा मोठा वाटा आहे. आज या ठिकाणी जम्बोरी म्हणजे जांभा दगडापासून बांधण्यात आलेले अतिशय सुंदर आणि मोहक असे हे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेण्याबरोबरच अनेक लोकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
https://x.com/belgaumlive/status/1713828752776675585?s=20
बेळगाव शहरातील 18 गल्ल्यामधील महिलावर्ग दर मंगळवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येने या मंदिरात श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी येत असतो. प्रत्येक गावात पाणवठ्याच्या ठिकाणी या पद्धतीचे एक हे मंदिर असतेच आणि अशा मंदिरांमध्ये देवता ही संबंधित गावाची ग्रामदेवता असते. त्या पद्धतीने बेळगावच्या ऐतिहासिक परंपरेला साजेल असे तानाजी गल्लीतील हे श्री रेणुका देवीचे मंदिर एक महत्त्वाचे मंदिर आहे. नवरात्र उत्सवानिमित्त सध्या या मंदिराची करण्यात आलेली आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई डोळ्याचे पारणे फेडणारी आहे.