बेळगाव लाईव्ह :राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी ग्राम स्वराज्य आणि स्वच्छतेची संकल्पना सर्वप्रथम अमलात आणली आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पुन्हा एकदा गांधींच्या उद्देशाला चालना दिली.
बेळगाव परिसरात अनेक अधिकारी राजकारणी नेते मंडळी लोकप्रतिनिधी स्वच्छते बाबत पुढाकार घेताना दिसत आहेत. अश्या वेळी बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामस्वच्छतेच्या बाबतीत चालू असलेली तीव्र मोहीम व तळमळ पाहिल्यास नक्कीच प्रशंसेला पात्र आहेत.
गेल्या काही दिवसात कंग्राळी खुर्द कडून महानगरपालिकेला निवेदन देऊन 24 तासाच्या आत कचरा उचलायला भाग पाडणे असो किंवा ज्या ठिकाणी लोक कचरा टाकतात त्या ठिकाणी स्वतः पहारा देणं किंवा वेळोवेळी मार्कंडे नदीचा परिसर स्वच्छ ठेवणे या सर्वच गोष्टी कौतुकास्पद आहेत.
पण गावच्या बाहेरील शाहूनगर,नेहरूनगर असो किंवा कंग्राळी गावच्या पुढील जी गाव आहेत त्या ठिकाणचे लोक ये-जा करताना नदीच्या परिसरात कचरा टाकत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी तिथे सूचना फलक लावून सीसीटीव्ही कॅमेरा बसवून कचरा टाकणाऱ्यांच्यावर पोलिसांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा पाटील, विनायक कमार,प्रशांत पाटील चेतक कांबळे, वैजू बेनाळकर तसेच ग्रामपंचायत क्लर्क किसन हदगल व कर्मचारी उपस्थित होते.