बेळगाव लाईव्ह:ओल्ड पी बी रोड ते बँक ऑफ इंडिया या रस्त्याचे झालेले नियमबाह्य आणि अवैज्ञानिक कामावर आक्षेप घेत विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करत मोर्चा काढला. स्मार्ट सिटीच्या कामांवर आक्षेप घेत संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर कारवाई करा अशी मागणी केली.
मंगळवार दुपारी छ्त्रपती शिवाजी महाराज उद्यान पासून बँक ऑफ इंडिया ते ओल्ड पी बी रोड या रस्त्यावर मोर्चा काढून मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटी कामा विरोधात निदर्शने केली.शेकडो महिलांनी हातात बुट्ट्या तर अनेक नागरिकांनी हातात फलक दाखवत घोषणाबाजी करत निदर्शने केली .
यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना आप पक्षाचे नेते राजू टोपन्नवर यांनी, ओल्ड पी बी रोड ते बँक ऑफ इंडिया या रस्त्यासाठी स्मार्ट सिटीचे साडे सहा कोटी खर्च केले आहेत ,हा स्मार्ट सिटीचा निधी केवळ विकासासाठी आहे पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी नाही असे सांगत , या रस्त्याचा सी डी पी सरळ असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना समान अंतर ठेवण्याचे असूनही रस्त्याच्या दक्षिण बाजूस आमदारांच्या ज्ञातीचे कल्याण मंडप रोड टच होण्यासाठी सी डी पी बदलून अनियमित रोडचे बांधकाम केले, असा गंभीर आरोप केला आहे.
याशिवाय काही लोकांच्या बाबतीत वैयक्तिक द्वेषापोटी दुसऱ्या बाजू कडील ज्यादा जागा संपादित केली आहे. त्याच बरोबर तत्कालीन बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी गैरव्यवहार करत बेव्हीनकट्टी यांच्या जागेवर रस्ता असूनही तो वळवून त्या जागेला ले आऊट परवानगी दिली अश्या पद्धतीने बेकायदेशीर ले आऊट मंजूर करून बेव्हीनकट्टी यांना फायदा पोचवला. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांची जागा गैर प्रकारे संपादित केलेली आहे त्यांना ती परत करून नुकसान भरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. त्यामुळे पालक मंत्र्याकडे आम्ही अशी मागणी करत आहोत की हा रस्ता मुळ सी डी पी प्रमाणे व शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करून देण्यात यावा आणि ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांची भरपाई शासकीय अधिकारी वर्गाकडून करून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
इलेक्ट्रिकल पोल मधील भ्रष्टाचाराची चौकशी करा
स्मार्ट सिटीच्या नवा कालचा भ्रष्टाचार बेळगावात उघड झालेला आहे. राष्ट्रपती कडून बेळगाव स्मार्ट सिटीला मिळालेला पुरस्कारा अगोदर राष्ट्रपतींनी पुरस्कार देण्या अगोदर बेळगावात कधी टीम पाठवून सर्व्हे करून पुरस्कार दिला का? असा सवाल महाराष्ट्र एकिकरण समितीचे नेते रमाकांत कोंडस्कर यांनी व्यक्त केला आहे.
स्मार्ट शेतीची कामे सुरू असताना पाच निष्पापांचा बळी गेलाय त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. कामे सुरू असताना अनेक गरिबांचा अपघातात बळी गेलाय त्याला हा पुरस्कार आहे आहे का? असाही सवाल त्यांनी व्यक्त केला.
स्मार्ट शेतीच्या नावाखाली जे इलेक्ट्रिकल पोल बसवले आहे त्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. खर्च केलेली रक्कम आणि सरकारकडून आलेला निधी यात मोठी तफावत आहे एका इलेक्ट्रिक पोल मध्ये 40 हजार रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे असे हजारो खांब दक्षिण मतदार संघात लावले गेलेत त्यांची चौकशी करून कारवाई व्हावी अशीही मागणी त्यांनी केली.यावेळी मोठ्या संख्येने विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .