बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा भीमाशंकर गुळेद यांचा पहिला ‘फोन इन’ कार्यक्रम आज जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयांमध्ये पार पडला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी सुमारे 45 तक्रारींची दखल घेतली.
जिल्ह्यातील जनतेच्या पोलीस खात्याशी संबंधित तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयामध्ये आज ‘फोन इन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) भीमाशंकर गुळेद फोनवर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांना तक्रार निवारण्याचे ठोस आश्वासन दिले. यावेळी पोलीस दलातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या ‘फोन इन’ कार्यक्रमासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद म्हणाले की, बेळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आज आम्ही फोन इन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून अधिकार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हा माझा पहिला फोन इन कार्यक्रम होता. माझ्या पूर्वीच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी हा जो स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे तो पुढे निरंतर चालू ठेवण्याची माझी देखील इच्छा होती. इथे येऊन एक महिना झाल्यानंतर मला त्याची जाणीव देखील झाली की हा फोन इन कार्यक्रम आपण केला पाहिजे.
कारण बेळगाव जिल्हा हा कर्नाटक राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे लोकांना जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयापर्यंत येण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. तसेच जेंव्हा ते इथे येतात त्यावेळी आमची उपलब्धी असेलच असे सांगता येत नाही. यासाठी मी निर्णय घेतला की पूर्वीच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी सुरू केलेला फोन इन कार्यक्रम पूर्ववत सुरू करायचा. आजच्या माझ्या या पहिल्या फोन इन कार्यक्रमामुळे मला एक नवा चांगला अनुभव मिळाला.
आज जिल्ह्यातून जवळपास 45 फोन कॉल आले होते. विशेष करून अथणी, कागवाड, रामदुर्ग तालुक्यासह यरगट्टी येथून फोन आले सर्वात जास्त फोन कॉल एका गावामधून बेकायदेशीर दारू विक्री संदर्भात आले त्यांची दखल घेत आम्ही आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना धाडी टाकण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच श्री बसवेश्वर सोसायटी या बंद असलेल्या पतसंस्थेसंदर्भात अधीक फोन आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख गुळेद यांनी दिली.