बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने राज्यातील 31 जिल्ह्यांमधील 236 तालुक्यांपैकी एकूण 216 तालुके दुष्काळग्रस्त असल्याची अधिकृत घोषणा केली असून यामध्ये नुकत्याच जाहीर केलेल्या बेळगाव, खानापूर तालुक्यांचा समावेश असलेल्या अतिरिक्त 21 दुष्काळग्रस्त तालुक्यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या दुष्काळ घोषणेच्या मार्गदर्शक सूची मधील निकषानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पीक नुकसान सर्वेक्षण अहवालाच्या आधारे राज्यातील दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या 216 तालुक्यांमध्ये 189 गंभीर दुष्काळी तालुके आणि 17 मध्यम आवर्षणप्रवण तालुके आहेत.
अतिरिक्त 21 अवर्षणप्रवण तालुक्यांपैकी 17 तालुके गंभीर दुष्काळी आणि 4 तालुके मध्यम दुष्काळी आहेत. यापूर्वी जाहीर झालेल्या 195 तालुक्यांपैकी 161 तालुके दुष्काळग्रस्त होते. शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे 34 तालुक्यांपैकी 22 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून 11 तालुके गंभीर आणि 21 तालुके मध्यम दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
अतिरिक्त 21 दुष्काळी तालुक्यांपैकी बेळगाव, खानापूर, चामराजनगर, अळनावर, अन्नीगेरी, कलघटगी, मुंडरगी, आलूर, अरसीकेरे, हासन, ब्याडगी, हानगल, शिग्गाव, पोन्नमपेठ, के.आर. नगर, हेब्बरी आणि दांडेली हे 17 तालुके गंभीर दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
दरम्यान, दुष्काळी तालुक्यांसाठी पुढील 6 महिन्यात नियोजनाबाबत राज्य सरकारने गेल्या गुरुवारी जिल्हा प्रशासनाला पत्रक जारी केले आहे. आपत्ती व्यवस्थापन नियमावलीनुसार जनावरांसाठी चारा, पिण्यासाठी पाणी आणि रोजगार निर्मिती बाबत सरकारने सूचना केल्या आहेत.
उपाययोजना करताना दुष्काळाची झळ कमीत कमी बसावी या उद्देशाने दुष्काळग्रस्त भागात दुष्काळ नियोजन हाती घेण्यात आले आहे. निधीची तरतूद करून व्यवस्थापन हाती घेण्याची सूचना आहे. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यात कार्यवाही सुरू झाली आहे. एकंदर सध्या दुष्काळी तालुक्यांसाठी उपाय योजनांसह प्रशासनाचे व्यवस्थापन सुरू आहे.