बेळगाव लाईव्ह:बेळगावचे जिल्हा शिक्षणाधिकारी (डीडीपीआय) बसवराज नलतवाड यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी रंगेहात पकडले असून यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
तुरमुरी (ता. कित्तूर, जि. बेळगाव) येथील विश्वविद्या चेतन हायर प्रायमरी स्कूल या शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन आर. कुरी यांच्या तक्रारीवरून लोकायुक्त पोलिसांनी उपरोक्त कारवाई केली. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, विश्वविद्या चेतन हायर प्रायमरी स्कूल या शाळेच्या परवाण्याचे वार्षिक नूतनीकरणाचे काम प्रलंबित होते.
हे काम करून देण्याच्या बदल्यात जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी शाळा मुख्याध्यापकांकडे 40 हजार रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक अर्जुन कुरी यांनी बेळगाव लोकायुक्तांकडे तक्रार नोंदवली होती.
सदर तक्रारीची तात्काळ दखल घेत लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचून जिल्हा शिक्षणाधिकारी नलतवाड यांना 40 हजार रुपयांची लाच घेताना आज शुक्रवारी रंगेहात पकडले. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून लोकायुक्त तपास अधिकारी पोलीस निरीक्षक उस्मान अवटी यांच्या नेतृत्वाखाली अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान खुद्द जिल्हा शिक्षणाधिकारी लाच घेताना रंगेहात सापडल्यामुळे बेळगावच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
तत्कालीन डी डी पी आय ए बी पुंडलिक आणि सध्याचे डी डी पी आय नलतवाड यांच्यात बदली वरून घमासान झाले होते त्यावेळी पासून नलतवाड हे चर्चेत आले होते.